मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर (Photo Credit- X)
जी. कमलिनी ही मुंबईच्या संघात यष्टीरक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत होती. तिला संघाने ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून आपल्याकडे कायम ठेवले होते. मात्र, आता दुखापतीमुळे तिला उर्वरित सामने खेळता येणार नाहीत. तिच्या जागी संघात आलेल्या वैष्णवी शर्माला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांच्या करारासह आपल्या ताफ्यात सामील केले आहे. वैष्णवी ही डावखुरी फिरकी गोलंदाज असून तिने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती.
Paltan, let’s give a super loud welcome to the newest member of our family! 💙 Vaishnavi Sharma will replace the injured Kamalini for the remainder of the #TATAWPL 2026 season. pic.twitter.com/s9kC77rWkJ — Mumbai Indians (@mipaltan) January 20, 2026
वैष्णवी शर्मा ही मूळची मध्य प्रदेशची रहिवासी असून तिने २०२५ मध्ये १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. जरी ती मेगा लिलावात अनसोल्ड राहिली असली, तरी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची छाप पाडली आहे. भारतासाठी ५ टी-२० सामने खेळताना तिने ५ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात होणाऱ्या वरिष्ठ महिला विश्वचषकासाठीही तिची भारतीय संघात निवड झाली आहे.
यंदाच्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची कामगिरी काहीशी निराशाजनक झाली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांपैकी ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागला असून केवळ २ सामने जिंकता आले आहेत. गेल्या महत्त्वाच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबईचा ७ गडी राखून पराभव केला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६१ धावा केल्या होत्या, मात्र यूपीने १८.१ षटकांतच हे लक्ष्य यशस्वीरीत्या पार केले. कमलिनीच्या जाण्याने यष्टीरक्षणाची नवी जबाबदारी आता कोणाला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हंगामाच्या उर्वरित भागात आपली जागा निश्चित करण्यासाठी मुंबईला आता विजय मिळवणे अनिवार्य आहे. वैष्णवी शर्माच्या समावेशामुळे मुंबईची फिरकी गोलंदाजी अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे, मात्र एका फलंदाजाच्या जागी गोलंदाज आल्यामुळे संघ आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये काय बदल करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






