फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अॅशेस मालिकेमध्ये इंग्लडच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीनही सामन्यामध्ये इंग्लडला पराभूत करुन मालिकेमध्ये विजय मिळवला होता. तर तिसऱ्या सामन्यानंतर इंग्लडच्या संघावर अनेक टीका करण्यात आली होती. त्याचबरोबर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याला देखील ट्रोल करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातील आणखी एका निराशाजनक अॅशेस दौऱ्यानंतर, इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्यावर दबाव वाढत आहे. त्यांच्याबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसर यांनी ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा सल्ला दिला आहे. मोंटी पनेसर यांच्या मते, रवी शास्त्री हे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणून एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतात, कारण त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची मानसिकता आहे. इंग्लंडने अॅशेस मालिका ११ दिवसांत गमावल्यानंतर आणि दोन कसोटी शिल्लक असताना ०-३ असा पिछाडीवर पडल्यानंतर, वरिष्ठ नेतृत्वात बदल आवश्यक असल्याचे पानेसर यांचे मत आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी रवी शास्त्री हे पूर्णपणे योग्य आहेत असे त्यांचे मत आहे.
पत्रकार रवी बिश्त यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना पनेसर म्हणाले की, इंग्लंडला अशा प्रशिक्षकाची गरज आहे जो ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच परिस्थितीत, धोरणात्मक आणि मानसिकदृष्ट्या कसे हरवायचे हे जाणतो. “तुम्हाला विचार करावा लागेल की, ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा योग्य मार्ग कोणाला माहित आहे? ऑस्ट्रेलियाच्या मानसिक, शारीरिक आणि धोरणात्मक कमकुवतपणाचा फायदा कसा घ्यायचा? मला वाटते की रवी शास्त्री हे इंग्लंडचे पुढचे मुख्य प्रशिक्षक असावेत,” असे पनेसर म्हणाले.
इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्याची पनेसर यांची सूचना पूर्णपणे त्यांच्या रेकॉर्डवर आधारित आहे. शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सलग बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. शास्त्रींच्या कार्यकाळात भारताने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदाच मालिका जिंकली. रवी शास्त्रींच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०२०-२१ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील जिंकली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत ४-० असा पराभव झाल्यानंतर मे २०२२ मध्ये मॅक्युलमला इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. पदभार स्वीकारल्यानंतर, मॅक्युलमने कर्णधार बेन स्टोक्ससह संघात सुरुवातीचे बदल केले, ज्याचे सुरुवातीला सकारात्मक परिणाम दिसून आले. मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने त्यांच्या पहिल्या ११ कसोटी सामन्यांपैकी १० सामने जिंकले, परंतु नंतर ती गती कमी झाली. इंग्लंडने त्यांच्या पुढील ३३ पैकी १६ सामने गमावले.






