नीरज आणि अर्शद नदीम एकमेकांसमोर, कोण मारणार बाजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या १७ व्या आवृत्तीत स्पर्धा करत असताना, २०२५ च्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे भालाफेकपटू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हे दोन खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून दोन वेळा ऑलिंपिक विजेता असलेला नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा पॅरिस ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम आहेत. सर्वांच्या नजरा आता या स्पर्धेवर लागून राहिल्या आहेत.
गेल्या बुधवारी (१७ सप्टेंबर २०२५) नीरज आणि अर्शद यांनी आपापल्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत, गट अ मध्ये, भारतीय स्टारने ८४.५० मीटरपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. नीरज आणि अर्शद नदीम दोघेही या खेळात माहीर असून आता या दोघांकडे लक्ष लागून राहिले आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव पाहता या सामान्यात नीरजने जिंकावे अशीच त्याच्या चाहत्यांची आणि देशाची अपेक्षा आहे.
कधी आणि कुठे पाहता येणार?
रोमांचक अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:५३ वाजता सुरू होईल. चाहते स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स २ वर घरी थेट खेळाचा आनंद घेऊ शकतात. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल.
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेले खेळाडू हे नीरज चोप्रा, अँडरसन पीटर्स, कर्टिस थॉम्पसन, ज्युलियन वेबर, जाकुब वॅडलेच, ज्युलियस येगो, केशॉर्न वॉलकॉट, डेव्हिड वॅग्नर, सचिन यादव, अर्शद नदीम, कॅमेरॉन मॅकएन्टायर आणि रुमेश थरंगा पाथिराज आहेत. दरम्यान सचिन यादवनेही आपली छाप पाडली आहे. केवळ नीरज चोप्राच नाही तर सचिन यादवनेही भारताकडून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. २६ वर्षीय खेळाडूने ८३.६७ मीटर फेकसह १० वे स्थान पटकावले.
अनेक दिग्गज खेळाडू अंतिम फेरीत
नीरज चोप्रा व्यतिरिक्त, अंतिम फेरीत ऑलिंपिक विजेता अर्शद नदीम, डायमंड लीग विजेता ज्युलियन वेबर, माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्स, ज्युलियस येगो, डेव्हिड वेंगनर, कर्टिस थॉम्पसन, कॅमेरॉन मैत्री, रुमेश थरंगा, जाकुब वॅडलेजच, केशॉर्न वॉलकॉट आणि सचिन यादव यांचा समावेश आहे. या १२ खेळाडूंपैकी सात खेळाडूंनी ९० मीटरपेक्षा जास्त फेक केली आहे. अँडरसन पीटर्सचा पात्रता फेरीतील सर्वोत्तम फेक ८९.५३ मीटर होता. या खेळाडूंमध्ये पीटर्सचा कारकिर्दीतील सर्वोत्तम फेक देखील आहे. त्याने २०२२ मध्ये ९३.०७ मीटर फेकले.
वेबरचा फॉर्म सर्वात धोकादायक
सध्याच्या फॉर्मच्या बाबतीत, जर्मनीचा ज्युलियन वेबर अव्वल फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या महिन्यात झुरिचमध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये ९१.५१ मीटर फेकले. त्याने दोनदा ९० मीटर ओलांडले आहेत. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला. तथापि, तो तरीही दुसऱ्या क्रमांकावर राहिला. वेबरनेही शर्यत जिंकली.