फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप : नुकताच पार पडलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या संघाला न्यूझीलंडने ८ विकेटने पराभूत केलं. न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकला आहे. भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये सुरुवात खराब केली त्यामुळे टीम इंडिया फक्त ४६ धावा करू शकल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ४०२ धावा केल्या आणि ३५६ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने ४६२ धावा केल्या आणि न्यूझीलंडच्या संघासमोर १०७ धावांचे लक्ष्य उभे केले होते. १०७ धावांचे भारताचे लक्ष्य त्यांनी सहज पार केले आणि विजय मिळवला. न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियाच्या विरोधात विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे.
या विजयासह न्यूझीलंडच्या संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत इंग्लंडला मागे टाकले आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाचे मोठे नुकसान झाले आहे. भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचा संघ ४४.४४ गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. तर इंग्लंड संघ ४३.०६ पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे. भारताचे काही गुण कमी झाले असतील, पण टीम इंडिया अजूनही पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे आता ६८.०६ गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ६२.५० गुण आहेत. भारताचा संघ बऱ्याच काळापासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारताच्या संघाला पुढील सामना जिंकणे गरजेचे आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने ३५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अनुक्रमे ५२ आणि ७० धावांची अर्धशतके झळकावली. यानंतर सरफराज खान आणि ऋषभ पंत यांनी कमान सांभाळली, त्यांच्यामध्ये १७७ धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. सर्फराजने १५० धावा केल्या, तर ऋषभ पंत ९९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजी कोलमडली आणि डाव ४६२ धावांवर संपला.
भारताने न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे माफक लक्ष्य ठेवले, जे पाहुण्या संघाने केवळ दोन गडी गमावून पूर्ण केले. दुसऱ्या डावात विल यंग ४८ धावा करून नाबाद माघारी परतला आणि रचिन रवींद्रने ३९ धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारताला घरच्या मैदानावर पराभूत केले.