आता कॉलिंगपूर्वी नाही ऐकू येणार Amitabh Bachchan चा आवाज, लोकांच्या वााढत्या त्रासामुळे सरकारने घेतला हा निर्णय
सध्या भारतातील प्रत्येक स्मार्टफोन युजर वैतागला आहे, याचं कारण आहे कॉलरट्यूनवरील अमिताभ बच्चन यांचा आवाज. कोणत्याही व्यक्तिला कॉल केल्यानंतर सर्वात आधी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर क्राईम वॉर्निंग ऐकू येते. सुमारे सर्वच स्मार्टफोन युजर्स या सायबर क्राईम वॉर्निंगने वैतागले आहेत. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आता कॉलरट्यूनवरील अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर क्राईम वॉर्निंग काढून टाकण्यात आली आहे. गुरुवारपासून ही सायबर क्राईम वॉर्निंग काढून टाकण्यात आली आहे. हा मेसेज सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या जागरूकता मोहिमेचा एक भाग होता. याचा उद्देश वाढत्या सायबर क्राईमबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं असा होता. मात्र यामुळे भलतंच घडलं. लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याऐवजी लोकांच्या त्रासामध्ये प्रचंड वाढ झाली. जेव्हा एखादा महत्त्वाचा फोन करायचा असतो आणि ही वॉर्निंग सुरु होते, तेव्हा लोकांची चिडचिड होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोशल मीडियावर देखील या सायबर क्राईम वॉर्निंगबाबत मिम्स व्हायरल होऊ लागले. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर देखील लोकं सायबर क्राईम वॉर्निंग हटवण्याची मागणी करू लागले होते. एका युजरने बिग बी यांच्या पोस्टवर देखील कमेंट केली होती की, “भाऊ, फोनवरील सायबर क्राईम वॉर्निंग बंद करा.” यावर अमिताभ बच्चन यांनी अतिशय मजेदार उत्तर दिले – “सरकारला सांगा, त्यांनी जे सांगितले ते आम्ही केले.” म्हणजेच, त्यांनी थेट सांगितले की त्यांनी हे सरकारच्या सूचनेवरून रेकॉर्ड केले आहे.
दुसऱ्या एका युजरच्या कमेंटवर देखील अमिताभ बच्चन यांनी जोरदार उत्तर दिलं होतं. अमिताभ बच्चन यांनी युजरच्या कमेंटवर “जो सथा, वो पथा” असं उत्तर दिलं होतं, याचा अर्थ “वयानुसार अनुभव आणि समज येते.” युजरच्या या वाढत्या त्रासामुळे आता सरकारने कॉलर ट्यूनवरील ही वॉर्निंग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता सायबर कॉलर ट्यून दिवसातून फक्त दोनदाच वाजेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही रुग्णवाहिका इत्यादी आपत्कालीन कॉल केला तर ही सायबर कॉलर ट्यून वाजणार नाही.
यापूर्वी देखील कॉलर ट्यूनसाठी अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात आलं होतं. कोवीड काळात जागरुकतेसाठी सुरु करण्यात आलेली कॉलर ट्यून लोकांसाठी त्रासदायक ठरत होती. त्यावेळी देखील लोकांनी ही कॉलरट्यून बंद करण्याची मागणी केली होती.