Han Jong Hee Death: Samsung Electronics च्या को-सीईओचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग यांचे आज मंगळवारी निधन झाले आहे. सह-सीईओ हान जोंग ही यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हान 63 वर्षांचे होते. दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने ही माहिती दिली आहे. को-सीईओ हान जोंग यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा परसली आहे. कंपनीच्या एका प्रवक्त्याने हान जोंग यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे.
हान हे सॅमसंगच्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल डिवाइसेज विभागाचे पर्यवेक्षक होते. आता त्यांच्या निधनानंतर, कंपनीचे दुसरे को-सीईओ जून यंग-ह्यून चिप व्यवसायाची देखरेख करत आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, हान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांच्या जागी कोण येणार हे निश्चित झालेले नाही. पण याबाबत लवकरच कंपनीकडून माहिती दिली जाऊ शकते. मंगळवारी सकाळी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये कोणताही मोठा बदल दिसून आला नाही. (फोटो सौजन्य – samsung)
मिळालेल्या माहितीनुसार, हान जवळजवळ 40 वर्षांपूर्वी सॅमसंगमध्ये सामील झाले आणि त्यंनी कंपनीच्या टीव्ही व्यवसायातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2022 मध्ये ते उपाध्यक्ष आणि सीईओ बनले. हान हे सॅमसंगच्या संचालक मंडळाचे सदस्य देखील होते. गेल्या आठवड्यात सॅमसंगच्या शेयरहोल्डर्सची बैठक हान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या काळात, शेयरहोल्डर्सनी कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना कठीण प्रश्न विचारले, कारण गेल्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तेजीचा फायदा घेण्यात अपयशी ठरल्यामुळे सॅमसंगचा स्टॉक टेक कंपन्यांमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक होता.
“सर्वप्रथम, अलिकडच्या काळात कंपनीच्या शेअर कामगिरीबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या वर्षभरात, आमची कंपनी वेगाने बदलणाऱ्या एआय सेमीकंडक्टर मार्केटला वेळेवर प्रतिसाद देऊ शकली नाही,” असे हान बैठकीत म्हणाले. बुधवारी सॅमसंगच्या नवीन होम अप्लायंसेज लाँच इवेंटला ते उपस्थित राहणार होते.
गेल्या काही तिमाहीत कंपनीचे उत्पन्न कमकुवत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीं देखील घसरल्या आहेत. प्रगत मेमरी चिप्स आणि कॉन्ट्रॅक्ट चिप उत्पादनात कंपनी तिच्या स्पर्धकांपेक्षा मागे पडली आहे. AI प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
हान यांनी इन्हा विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर ते 1988 मध्ये कंपनीत सामील झाले. सॅमसंगच्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल डिवाइसेज विभागामध्ये सहभागी होण्यापूर्वी ते डिस्प्ले ऑपरेशनचे इनचार्ज होते. सॅमसंगच्या LED टिव्हीच्या यशामागे हान यांचा मोठा सहभाग आहे.