स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
अंतराळातील वस्तूंचा मागोवा घेणारे तज्ज्ञ बिल ग्रे यांच्या अंदाजानुसार, हे रॉकेट सुमारे ८,७०० किलोमीटर प्रतितास वेगाने चंद्रावर आदळेल. हा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जवळपास सातपट अधिक आहे. ही धडक चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागात होणार असली, तरी तिचा प्रकाशझोत अत्यंत क्षीण असल्याने पृथ्वीवरून तो उघड्या डोळ्यांनी पाहणे कठीण असेल. मात्र, दुर्बिणीच्या साहाय्याने धडकेनंतरचा धूळ-मलब्याचा ढग काही मिनिटे दिसू शकतो.
या धडकेमुळे चंद्रावर सुमारे २७ मीटर (९० फूट) रुंद आणि ५ मीटर (१६ फूट) खोल खड्डा तयार होण्याची शक्यता आहे. हा खड्डा पृथ्वीवरून दिसणार नसला, तरी चंद्राच्या कक्षेत फिरणारी याने त्याची छायाचित्रे टिपतील. नासाचे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर आणि दक्षिण कोरियाचे डानुरी लूनर ऑर्बिटर धडकेपूर्वी आणि धडकेनंतरचे फोटो घेणार आहेत. डानुरी हे यान धडकेच्या अवघ्या दोन मिनिटे आधी रॉकेटच्या संभाव्य चडकेच्या ठिकाणाजवळून जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मानवनिर्मित वस्तूंची चंद्रावरील धडक ही पहिली घटना नाही. २०२२ मध्ये एका चिनी रॉकेटचा अवशेष चंद्राच्या दूरच्या बाजूला कोसळला होता. त्याआधी नासाने अपोलो मौहिमांदरम्यान आणि २००९ च्या लूनर क्रेटर ऑब्जर्वेशन एंड सेसिग सॅटेलाइट मोहिमेतही संशोधनासाठी जाणीवपूर्वक रॉकेटचे भाग चंद्रावर आदळवले होते.’
लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीचे वैज्ञानिक बेंजामिन फर्नांडो यांच्या मते, चंद्रावरील कमी गुरुत्वाकर्षण आणि वातावरणाचा अभाव यामुळे धडक झाल्यानंतर उडणारी धूळ व मलबा अनेक किलोमीटरपर्यंत पसरेल, भविष्यात चंद्रावर होणाऱ्या मानवी मोहिमांसाठी अंतराळातील अशा मलब्यामुळे किती धोका निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करण्यासाठी ही घटना महत्त्वाची ठरणार आहे.






