'ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,' शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार
विधानभवनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला दिलेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार साहेब राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी मी तिथे गेलो. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपणे ही आमची भूमिका आहे. यामुळे ज्यांच्या पोटात दुखत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल, त्यांच्यासाठी मुंबई आणि ठाण्यात अनेक ‘आपला दवाखाना’ सुरू आहेत. त्यांनी तिथे जाऊन उपचार करून घ्यावेत.” यासोबतच, अशा प्रकारच्या टीकेकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचा पलटवार; मिसिंग लिंक वादावर भाजप-मनसे आमनेसामने
याआधी संजय राऊत यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात पक्षाची बैठक घेणे ही शिवसैनिकांना दुखावणारी कृती असल्याचे म्हटले होते. “ज्या व्यक्तीने आमचे सरकार पाडले, त्यांच्या दालनात बैठक घेणे मोठ्या नेत्याच्या विश्वासार्हतेला धक्का देणारे आहे,” अशी टीका त्यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राऊतांवर निशाणा साधला.
दरम्यान, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया देताना, “राजकारणात कोणी कायमचे शत्रू नसतात. उद्या उद्धव ठाकरे आले तरी त्यांचेही आम्ही स्वागत करू,” असे म्हटले. याशिवाय त्यांनी जयंत पाटील यांच्याबाबतही सूचक विधान करत, “तुमच्यासाठी शिवसेनेत जागा करू शकतो,” असे बोलल्याचे सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांच्या भेटी झाल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, या विषयावर अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही.






