(फोटो सौजन्य: Pinterest)
सांस्कृतिक वारसा, भव्य वास्तुकला आणि मनमोहक प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले इटली आपल्या एका योजनेमुळे आता जगभर चर्चेत आले आहे. ही योजना अनेकांना थक्क करणारी ठरेल. जिथे आजकाल घरांची किंमत करोडोंच्या घरात पोहचली आहे तिथेच इटली तुम्हाला 90 रुपयांत घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. कल्पना करा की फक्त 1 युरो (सुमारे 90 रुपये) मध्ये तुम्ही इटलीतील एका सुंदर गावात घर खरेदी करू शकता. होय, हा विनोद नसून वास्तव आहे. इटलीमध्ये अशी अनेक छोटी शहरे आणि गावे आहेत जिथे फक्त 1 युरोमध्ये घर खरेदी करण्याची संधी आहे, परंतु ही योजना दिसते तितकी सोपी नाही. ही योजना काय आहे आणि इतक्या कमी रुपयांत घर देण्यामागची कारण काय तसेच या योजनेचा तुम्ही कसा घेऊ शकता या सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात.
कशी झाली या योजनेची सुरुवात?
इटलीतील अनेक लहान शहरे आणि गावे गेल्या काही दशकांपासून लोकसंख्या घटण्याच्या समस्येशी झुंजत आहेत. रोजगार आणि उत्तम जीवनाच्या शोधात तरुण पिढी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे, त्यामुळे या गावांमध्ये घरे आणि इमारती रिकाम्या पडल्या आहेत. या रिकाम्या घरांच्या देखभालीअभावी ते निर्जन बनू लागले आहेत. या समस्येचा सामना करण्यासाठी, इटलीतील अनेक गावांनी एक अनोखी योजना सुरू केली, ज्यामध्ये लोकांना फक्त 1 युरोमध्ये घर खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. या गावांचे पुनरुज्जीवन करणे आणि नवीन रहिवाशांना आकर्षित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कोणत्या शहरांत आणि गावांमध्ये ही संधी उपलब्ध आहे?
इटलीतील अनेक छोटी शहरे आणि गावे या योजनेचा भाग बनली आहेत. काही प्रमुख नावे आहेत – सिसिलीमधील साम्बुका गाव, पिडमॉन्ट प्रदेशातील बारगा आणि कॅम्पानिया प्रदेशातील सेलेमे. ही गावे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखली जातात, परंतु लोकसंख्या घटल्यामुळे त्यांची चमक कमी झाली आहे. या गावांतील स्थानिक सरकारे आता नवीन लोकांना आकर्षित करण्यासाठी हा अनोखा प्रकल्प चालवत आहेत.
1 युरोमध्ये म्हणजेच 90 रुपयांत घर खरेदी करण्याचे तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते मात्र यासाठी तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागतील. चला या अटींविषयी सविस्तर जाणून घेऊया.
नूतनीकरण योजना सादर करणे आवश्यक
घर खरेदी केल्यानंतर, तुम्ही नूतनीकरण योजना सादर करणे आवश्यक आहे. हे साधारण 365 दिवसांच्या आत होणे आवश्यक आहे
नोटरी फी किती असेल?
तुम्हाला नोंदणी आणि मालमत्ता ट्रान्स्फर करण्यासाठी नोटरी फी भरावी लागेल
वेळेची मर्यादा
यात वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे ज्यानुसार पालिकेकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर, तुम्हाला त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत नूतनीकरणाचे काम सुरू करावे लागेल
सुरक्षा निधी
तुम्ही काम पूर्ण कराल याची खात्री करण्यासाठी, तुम्हाला €1,000 ते €5,000 चा सुरक्षा निधी जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सामान्यत: तीन वर्षांत तुम्हाला परत केली जाते.
या गोष्टी लक्षात असूद्यात
काय आहेत या योजनेचे फायदे?
या योजनेचे अनेक फायदे आहेत. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही इटलीतील एका सुंदर गावात अगदी कमी खर्चात घर खरेदी करू शकता. दुसरे म्हणजे, ज्यां लोकांना शहराच्या गजबजाटापासून दूर शांत आणि नैसर्गिक वातावरणात राहायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते. याची आणखीन एक खासियत म्हणजे ही योजना या इटालियन गावांना नवसंजीवनी देत आहे, ज्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार आहे.
इटली व्यतिरिक्त इतर देशातील लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात?
इटलीच्या 1 युरोमध्ये घर खरेदी करण्याची ही ऑफर इतर देशातील लोकांसाठीही फायद्याची ठरू शकते. मात्र यासाठी परदेशी लोकांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इटली आणि आपल्या देशामध्ये काही करार झाले पाहिजेत. सामान्य नियम असा आहे की जर एखादा इटालियन नागरिक तुमच्या देशात घर खरेदी करू शकतो, तर तुम्ही इटलीमध्येही घर घेऊ शकता. याव्यतिरिक्त, घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला इटालियन टॅक्स कोड प्राप्त करणे आणि काही कायदेशीर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.