(फोटो सौजन्य: Pinterest)
दुबई हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यतन स्थळांपैकी एक आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून रोज हजारो पर्यटक इथे येत असतात. इथे पाहण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. इथे जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा आहे. दुबई हे भारतापासून फार लांब आहे ज्यामुळे इथे जायचे म्हटले तर आपल्याकडे विमान प्रवास हा एकच मार्ग आहे. परंतु, आम्ही तुम्हाला सांगतो की, भविष्यात तुम्ही थेट रेल्वेने दुबईला जाणे शक्य होणार आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरंच घडू शकतं.
जसजसा काळ बदलत आहे, नवीन प्रगत तंत्रज्ञानही येत आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला कधीही न घडणाऱ्या गोष्टीही घडताना दिसून येतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारिक प्रकल्पाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये मुंबई आणि दुबई २००० किलोमीटर लांबीच्या पाण्याखालील रेल्वे लिंकद्वारे जोडले जातील. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जर भविष्यात हे शक्य झाले, तर हा प्रकल्प भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) दरम्यानच्या प्रवासात निश्चितच क्रांती घडवून आणेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पाण्याखालील रेल्वे लिंकवर गाड्या ताशी ६०० किलोमीटर ते १००० किलोमीटर प्रति तास वेगाने धावतील. जर तुम्ही मुंबईहून दुबईला विमानाने गेलात तर प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणतः ३ ते ४ तास लागतात, परंतु या पाण्याखालील ट्रेन प्रवासामुळे मुंबई ते दुबई दरम्यानचा प्रवास वेळ फक्त २ तासांवर येईल. याचा अर्थ असा की ही ट्रेन तुम्हाला विमानापेक्षाही जलद दुबईला घेऊन जाईल.
समुद्राच्या खालून जाणार ट्रेन
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, भारत आणि दुबई दरम्यानचा पाण्याखालील रेल्वे मार्ग सुमारे १२०० मैल (सुमारे २००० किलोमीटर) लांब असेल, जो समुद्राखाली व्यापला जाईल. याचाच अर्थ ही ट्रेन समुद्राखालून जाईल. जर हे शक्य झाले तर मुंबई ते दुबई प्रवास करणे खूप सोपे होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, हा रेल्वे मार्ग २०३० पर्यंत पूर्ण होऊ शकतो. दरम्यान, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हा उत्तम प्रकल्प यूएईच्या नॅशनल ॲडव्हायझर ब्युरो लिमिटेडने प्रस्तावित केला आहे. वाहतूक पायाभूत सुविधांना आकार देणे आणि हवाई प्रवासाला पर्यायी पर्याय प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तथापि, या पाण्याखालील रेल्वे प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक लागेल. ही ट्रेन केवळ प्रवाशांच्या सोयी वाढवणार नाही तर दुबईहून भारतात कच्चे तेल आणि इतर वस्तूंची वाहतूक करण्याचा एक नवीन मार्ग देखील तयार करेल. या प्रकल्पावर अजूनही चर्चा सुरू आहे. तथापि, जर ते मंजूर झाले तर २०३० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.