(फोटो सौजन्य: Pinterest)
जगभरात अनेक धार्मिक स्थळं आहेत. भाविकांच्या मनात धार्मिक स्थळांसाठी एक विशेष स्थान आहे. धार्मिक स्थळी भेट देताच आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात अशी भावना आहे. हेच कारण आहे की, लोक दूर दूरवरून अशा स्थळांना भेट द्यायला जातात. भारतातही अशी अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला जपानच्या अशा एक मंदिराविषयी माहिती सांगत आहोत जे नातेसंबंधांचे भविष्य ठरवण्यासाठी खास करून ओळखले जाते. हे असे मंदिर जगभरात तुम्हला फक्त जपानमध्येच पाहायला मिळेल.
आधुनिक आणि प्रगत गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये प्रेम आणि नातेसंबंधांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले एक शहर आहे. हे शहर म्हणजे इझुमो , जे शिमाने प्रीफेक्चरमध्ये आहे. इझुमो हे जपानमधील सर्वात पवित्र असल्याचे मानले जाते आणि येथे असलेले इझुमो तैशा मंदिर हे जपानमधील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण शिंटो मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर प्रेम आणि नातेसंबंधांचे भविष्य ठरवणाऱ्या 80 लाख देवी-देवतांचे निवासस्थान असल्याचे मानले जाते.
मंदिराचे महत्त्व
इझुमो तैशा श्राइनचा इतिहास सुमारे 2,000 वर्षांपूर्वीचा आहे आणि ते जपानमधील सर्वात जुन्या शिंटो देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिराला “कामी नो कुनी” म्हणजेच “देवांची भूमी” असेही म्हणतात. असे मानले जाते की दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात या मंदिरात जपानमधील सर्व देवी-देवता एकत्र येतात. या महिन्याला “कन्नाझुकी” म्हणतात, परंतु इझुमोमध्ये याला “कामियारिझुकी” असे म्हटले जाते. यादरम्यान इथे विशेष उत्सव आणि विधी पार पडतात.
प्रेम आणि नातेसंबंधांचे प्रमुख केंद्र
इझुमो तैशा मंदिर विशेषतः प्रेम आणि लग्नासाठी ओळखले जाते. येथील देवता, ओकुनिनुशी नो मिकोटो, ही प्रेम आणि नातेसंबंधांची देवता मानली जाते. असे मानले जाते की ओकुनिनुशी नो मिकोटो लोकांच्या नातेसंबंधांचे भविष्य ठरवते आणि त्यांना योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत करते. म्हणूनच जपान आणि जगभरातून लोक प्रेम आणि चांगले नातेसंबंधांच्या इच्छा घेऊन येथे येतात. या मंदिराच्या आत एक खास जागा आहे जिथे लोक प्रेम आणि नातेसंबंधाच्या इच्छा घेऊन येतात. तेथे एक पवित्र दोरी आहे ज्याला लोक स्पर्श करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. असे मानले जाते की ही दोरी देवतांना जोडली जाते आणि त्याद्वारे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.
80 लाख देवी-देवता ठरतात नात्याचे भविष्य
जपानी शिंटो धर्मात यायोरोझु नो कामी म्हणजेच 80 लाख देव-देवतांची संकल्पना आहे. ही संख्या प्रत्यक्षात असंख्य देवतांचे प्रतिनिधित्व करते, जे निसर्ग, मानवी जीवन आणि इतर विविध पैलूंशी संबंधित आहेत. या देवता इझुमो तैशा मंदिरात उपस्थित असल्याचे मानले जाते. या स्वतः देवता लोकांच्या नातेसंबंधांचे भविष्य ठरवतात अशी मान्यता आहे. त्यामुळे हे मंदिर प्रेम आणि लग्नासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.
फक्त धार्मिक कारणामुळेच नाही तर तुम्ही या शहराला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा देखील अनुभव घेऊ शकता. हे जपानमधील एक सुंदर ठिकाण आहे. मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात हिरवीगार झाडे, पारंपारिक जपानी वास्तुकला आणि येथे येणाऱ्या लोकांना आध्यात्मिक शांती देणारे प्रसन्न वातावरण आहे. मंदिराजवळ इनासा नो हमा नावाचा सुंदर समुद्रकिनारा आहे, जे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. जे लोक इझुमो तैशा मंदिराला भेट देतात ते सहसा येथे पवित्र विधींमध्ये भाग घेतात आणि त्यांच्या नातेसंबंधांसाठी देवांकडे आशीर्वाद मागतात. जगभरातून दरवर्षी अनेक जोडपे इथे आपले नाते घट्ट करण्यासाठी आणि भविश्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात.