Lalit Modi Vijay Mallya viral video : भारतात आर्थिक गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरवले गेलेले आणि ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित करण्यात आलेले ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा लंडनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघेही पार्टीत कराओके करताना, गाणे गाताना आणि मजा करताना दिसत आहेत. त्यांच्या या ‘आनंदोत्सवाने’ इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
व्हिडिओमध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या फ्रँक सिनात्रा यांचे प्रसिद्ध गाणे “And now, the end is near…” गाताना दिसतात. दोघांची केमिस्ट्री आणि उत्साह पाहून पार्टीतील वातावरण अत्यंत जल्लोषात असल्याचे स्पष्ट दिसते. हा व्हिडिओ ललित मोदी यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला होता. काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. या भव्य पार्टीत सुमारे 310 हून अधिक पाहुणे सहभागी होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती, बिझनेस डीलर्स, काही क्रिकेटपटू आणि विशेषतः वेस्ट इंडीजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल यानेही या पार्टीत हजेरी लावली होती.
ललित मोदी आणि विजय मल्ल्या कोण?
ललित मोदी हे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) माजी आयुक्त असून 2010 मध्ये भारतातून निघून गेले होते. त्यांच्यावर फेमा उल्लंघन, मनी लाँडरिंग आणि आर्थिक अनियमितता यासारखे गंभीर आरोप आहेत. तेव्हापासून ते लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. विजय मल्ल्या हे किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती असून 2016 मध्ये भारतातून पळून गेले. त्यांच्यावर 900 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. भारत सरकारने दोघांच्याही प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत, परंतु त्यांना ब्रिटनमधून अद्याप परत आणण्यात यश आलेले नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरणार?? दोन आठवड्यांत 1000हून अधिक भूकंप, जपानच्या टोकारा बेटांवर भीतीचं सावट
ब्रिटनमधील कायदेशीर संघर्ष आणि ‘लाइफस्टाइल’
भारतात ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केल्यानंतरही, या दोघांची लाइफस्टाइल मात्र बदलली नसल्याचे या व्हिडिओतून दिसून येते. सध्या दोघेही ब्रिटनमधील कायदेशीर संरक्षणाअंतर्गत राहत असून, त्यांच्याविरुद्ध भारत सरकारच्या वतीने कायदेशीर लढाई सुरू आहे. अलीकडेच, यूके उच्च न्यायालयाने विजय मल्ल्याच्या दिवाळखोरीसंदर्भातील अपील फेटाळले होते. दुसरीकडे, ललित मोदी यांनी आपल्याविरुद्धचे खटले राजकीय प्रेरित असल्याचा दावा केला आहे. विजय मल्ल्या यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “माझी १४,१३१ कोटी रुपयांची मालमत्ता सरकारने जप्त केली आहे, जी माझ्यावर असलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे.” यावर ललित मोदी यांनी उत्तर देताना लिहिले, “हे देखील संपेल,” अशा शब्दांत त्यांनी मल्ल्याला धीर दिला.
credit : social media
जनतेत संताप आणि टीका
या व्हिडिओनंतर भारतातील नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून आली. सोशल मीडियावर अनेकांनी दोघांवर टीका केली असून, “ज्यांनी देशाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली, ते परदेशात पार्टी करत आहेत आणि सरकार काहीच करू शकत नाही, ही खेदजनक बाब आहे,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाचा तालिबानला खंबीर पाठिंबा! पुतिन यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे पाकिस्तानचेही मोठे नुकसान
आर्थिक गुन्हे
भारतात आर्थिक गुन्हे करून विदेशात पळून गेलेले ललित मोदी आणि विजय मल्ल्या हे आजही ‘रॉयल लाइफ’ जगत असल्याचे या व्हिडिओमधून स्पष्ट होते. सरकारकडून त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू असले तरी, यश मिळेपर्यंत ते अशाचपद्धतीने चर्चेचा विषय ठरत राहतील, हे निश्चित.