26/11 च्या आतंकवादयाला पाकिस्तानच्या तुरुंगात ‘अज्ञात’ व्यक्तीकडून विषप्रयोग; लष्कराचा दहशतवादी साजिद मीर व्हेंटिलेटरवर

अमेरिकेने त्याच्यावर 5 दशलक्ष डॉलर्स (41.68 कोटी रुपये) बक्षीस ठेवले आहे. जून 2022 मध्ये, त्याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात शिक्षा सुनावली होती.

    ‘अज्ञात लोकांनी’ पाकिस्तानमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी नेता साजिद मीर व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्यावर अज्ञातांनी अन्नातून विष प्रयोग केला. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याचा तो सूत्रधार आहे. पाकिस्तानातील डेरा गाझी खान येथील सेंट्रल जेलमध्ये त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर सीएमएच बहावलपूर येथे उपचार सुरू आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने त्यांना एअरलिफ्ट करून येथील रुग्णालयात आणले आहे.

    या प्रकरणी पाकिस्तानचे पोलीस प्रशासन तुरुंगात अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीवर संशय व्यक्त करत असून त्याच्याविरोधातही चौकशी सुरू करण्यात आली आहे. तो एक खाजगी स्वयंपाकी आहे ज्याला ऑक्टोबर 2023 मध्ये तुरुंगात पुन्हा नियुक्त करण्यात आले होते. आता तो फरार झाला आहे. अलीकडच्या काळात, पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या बातम्या येत आहेत आणि त्यामध्ये ‘अज्ञात लोकांची’ नावं नमूद करण्यात आली आहेत. आता हे ‘अज्ञात’ कोण आहेत याबद्दल कोणीही काही माहिती मिळू शकली नाही.

    कोण आहे साजिद मीर?
    साजिद मीर हा त्या दहशतवाद्यांपैकी एक आहे ज्यांनी २६/११ च्या हल्ल्याची योजना आखण्यात मोठी भूमिका बजावली होती. काही दिवसांपूर्वी त्याला लाहोर सेंट्रल जेलमधून हलवण्यात आले होते. अमेरिकेने त्याला मोस्ट वाँटेड यादीतही ठेवले आहे. साजिद मीरचे वय 40 ते 50 वर्षांच्या दरम्यान आहे. अमेरिकेने त्याच्यावर 5 दशलक्ष डॉलर्स (41.68 कोटी रुपये) बक्षीस ठेवले आहे. जून 2022 मध्ये, त्याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात शिक्षा सुनावली होती.

    पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी साजिद मीर मृत झाल्याची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला होता. पण, पाश्चिमात्य देशांनी ते मान्य करण्यास नकार देत ते सिद्ध करावे, असे सांगितले. अलीकडेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता, परंतु चीनने त्याला व्हेटो देऊन रोखले. चीन दहशतवादाशी लढण्यासाठी गंभीर नसल्याचेही भारताने यावेळी म्हटले होते.