फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेने इराणसोबत काम करणाऱ्या डझनभर कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये भारताच्या “गब्बारो शिप सर्व्हिसेस” कंपनीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. इराणने इस्रायलवर 1 ऑक्टोबरला केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. इराणच्या तेल व्यापाराशी निगडित असलेल्या अनेक कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. गब्बारो शिप सर्व्हिसेस आशियाई देशांना इराणी तेल पुरवते, आणि याचा एक भाग असलेला हॉर्नेट टँकर अमेरिकेच्या दृष्टीने इराणच्या ‘भूतांच्या ताफ्याचा’ सदस्य मानला जातो, जो तेलाची तस्करी करतो.
या देशाच्या कंपन्यांवरही बंदी
या निर्बंधांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत या कंपन्यांना काम करता येणार नाही. यामध्ये UAE, मलेशिया, हाँगकाँग आणि सुरीनाममधील काही कंपन्यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचा हल्ला इस्रायलमधील तेल अवीव सारख्या दाट लोकसंख्या असलेल्या भागांना लक्ष्य करून केला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे या हिंसात्मक कृतींना थांबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- इराणचा ‘न्यूक्लीयर प्लॅन्ट’ नष्ट होणार? इस्रायल आखत आहे एक अत्यंत धोकादायक योजना
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारताच्या व्यापार क्षेत्रात मोठा परिणाम होऊ शकतो
इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढल्यास त्याचा भारतावर आणि मध्यपूर्वेतील इतर देशांवरही परिणाम होऊ शकतो. भारत आणि इराणचे व्यापारी संबंध फार जुने आहेत. भारत मोठ्या प्रमाणावर इराणला बासमती तांदूळ आणि चहा निर्यात करतो, तसेच इराणकडून सूर्यफूल तेल आयात करतो. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये भारताने इराणला $680 दशलक्ष किमतीचा बासमती तांदूळ निर्यात केला होता. हा तांदूळ भारताच्या एकूण उत्पादनाच्या 19% आहे. जर इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले, तर भारताच्या तांदूळ निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
त्याचप्रमाणे, इराणकडून आयात होणाऱ्या सूर्यफूल तेलावरही परिणाम होईल, ज्यामुळे भारतातील तेलाच्या किंमती वाढू शकतात. युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम भारतावर आणि इतर आशियाई देशांवर होऊ शकतो.