अमेरिकेने भारतावर लादला २५ टक्के टॅरिफ (फोटो- ani)
१. भारताने रशिया व चीनसोबत व्यापार केल्याने अमेरिका नाराज
२. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताविरुद्ध मोठा निर्णय
३. दोन्ही देशांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे ट्रम्प यांचे भाष्य
Donald Trump Tarrif News: अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशिया आणि चीनसोबत व्यापार करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावल्यानंतर एक ट्विट देखील केले आहे. एक ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. दोन्ही देशांमध्ये काही ठीक नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत आपला मित्र देश असला तरी तुलनेने आपण त्याच्यासोबत कमी व्यापार केलेला आहे. कारण त्यांचे आयातशुल्क जगातील सर्वात जास्त शुल्क आहे. त्यांनी लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे. रशियाचे ते सर्वात मोठे खरेदीदार आहेत. त्यामुळे भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे.
अमेरिका हा भारतासाठी मोठा व्यापारी भागीदार आहे. 2024 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 81 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात केली, जी भारताच्या एकूण निर्यातीच्या 17.7% आहे. सध्या भारताचा अमेरिकेशी व्यापार अधिशेष आहे, म्हणजेच भारत अमेरिकेला विकतो त्यापेक्षा कमी वस्तू खरेदी करतो. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर या नव्या टॅरिफचा मोठा परिणाम होऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी! पुन्हा युद्धबंदीचा दावा अन् टॅरिफ लादण्याची सक्ती
याशिवाय पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी भारताने त्यांच्या सांगण्यावरुन पाकिस्तानसोबत युद्धबंदी केल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. त्यांनी भारताला पाकिस्तानसोबतचा संघर्ष संपवण्याचे आवाहन केले होते यामुळे हा मोठा संघर्ष थांबला असल्याचे म्हटले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्यापासून ट्रम्प यांनी जवळपास २० हून अधिक वेळा युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. भारताने यावर स्पष्टपणे नकार देऊनही ट्रम्प सतत हा मुद्दा उस्थित करत आहेत.
SBI रिसर्चनुसार, 15-20% टॅरिफमुळे भारताची निर्यात 3-3.5% कमी होईल. काही अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे की या नव्या टॅरिफमुळे भारताच्या GDP मध्ये 0.16% ते 2.1% पर्यंत घट होऊ शकते. यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.