फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका-चीन संबंधांमध्ये तणाव असताना ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी सी जिनपिंग यांना निमंत्रण दिले होते. मात्र, शी जिनपिंग यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे की नाही, यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
202 जानेवारी 2025 ला शपथविधी सोहळा
तसेच वॉशिंग्टन येथील चिनी दूतावासानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे, जिथे अनेक जागतिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन, जे ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जातात, त्यांनी अद्याप सोहळ्यात सहभागी होण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.ट्रम्प यांच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, “जागतिक नेते ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत, कारण त्यांना खात्री आहे की ट्रम्प पुन्हा सत्तेवर येऊन जागतिक शांततेसाठी आपले योगदान देतील.”
चीनच्या आयात उत्पादनांवर 100% शुल्क
याचवेळी, ट्रम्प यांनी चीनविरोधी धोरणावर कठोर पाऊले घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 100% शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. तसेच, चीनच्या टिकटॉक ॲपच्या मालकी हक्काबाबतही कठोर पावले उचलली जातील, अशी सूचक वक्तव्ये केली आहेत. टिकटॉकला 19 जानेवारीपर्यंत अमेरिकेत निर्बंध टाळण्यासाठी कंपनी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सध्या टिकटॉक ही बंदी न्यायालयात आव्हान देत आहे.
तैवानचे समर्थन करणारा अमेरिका
अमेरिका तैवानचा महत्त्वाचा अनौपचारिक पाठीराखा आहे. अमेरिकेकडून तैवानला शस्त्रास्त्र पुरवठा केला जातो, यामुळे तैवानची लष्करी क्षमता वाढत आहे. चीन यावर तीव्र नाराजी व्यक्त करत असून तैवानला इतर देशांपासून अलग करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, तैवान व अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होत आहेत, तर चीनने आपली नाराजी व्यक्त करत प्रतिकाराची भूमिका घेतली आहे.
ट्रम्प यांचे 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ऐतिहासिक पुनरागमन
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून ऐतिहासिक पुनरागमन केले आहे. त्यांनी 295 इलेक्टोरल मते मिळवून डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. अमेरिकेच्या इतिहासात सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपद मिळवणारे ट्रम्प हे ग्रोव्हर क्लीव्हलँडनंतरचे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेत अमेरिका-चीन संबंध कसे बदलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.