'America Frist' धोरणाचा पुन्हा नारा! ट्रम्पचे ग्रीनलँड, पनामा कालवा आणि नाटोवर वादग्रस्त विधाने, जगात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी सुरुवातील नाटोवर भाष्य केले. त्यांनी नाटोतील अमेरिकेच्या भूमिकेवर भर देत दावा केला की, आतापर्यंत कोणत्याही जिवंत आणि मृत नेत्यापेक्षा अधिक काम त्यांनी केले आहे. पण भविष्यात अमेरिका नाटोच्या मदतीला धावून गेला तर इतर सदस्य देश साथ देतील का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय अमेरिकेशिवाय नाटो अस्तित्वातच राहू शकत नाही असेही त्यांनी म्हटले.
याच वेळी ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धावर बोलताना म्हटले की, या देशांमधील युद्ध संपवणे कठीण आहे. कधी रशिया युद्धबंदीसाठी तयार नसतो, तर कधी युक्रेन नसतो. दोन्ही देशांनी आमचे ऐकले असते तर आज परिस्थिती वेगळी असती असेही ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांच्या मते दोन्ही देशात समन्वय नसल्यामुळेच युद्धबंदीत अडथळे येत आहेत.
याशिवाय गेले काही दिवस ग्रीनलँडवरुन ट्रम्प सतत आक्रमक होताना दिसत आहे. काल झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्येही ट्रम्प पुन्हा आक्रमक होताना दिसले. ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदीच्या मुद्यावरुन भविष्यात सर्व काही स्पष्ट होईल असे रहस्यमयी विधान केले यामुळे ट्रम्प नेमका कोणता डाव खेळताय हे अस्पष्टच म्हणायचे. याच वेळी ट्रम्प यांनी पनामा कालव्याचाही उल्लेख केला. भविष्यात पनामा कालवा देखील अमेरिकेच्या नियंत्रणाखाली येऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे ट्रम्प यांनी इराण आणि युरोपीय देशांबाबतही वादग्रस्त विधाने केली. ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेच्या दबावामुळे इराणने लोकांची फाशीची शिक्षा तात्पुरती रद्द केली आहे. परंतु भविष्यात जर कोणालाही फाशी देण्यात आली तर लष्करी कारवाईचा पर्याय अमेरिकेकडे आहेच असे त्यांनी स्पष्ट केले. तर युरोपी देशांच्या नेत्यांशी सुरु असलेल्या वादावरुन त्यांनी टीका केली. तसेच नॉर्वेवर नाराजी व्यक्त करत नोबेल पुरस्काराची मागणी केली.






