फोटो सौजन्य सोशल मीडिया
आग वेगाने पसरल्याने रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असलेल्या पर्यटकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या अशा घटनेने आसपासच्या परिसरात आगीत मरण पावलेल्यांबद्दल सहानभूती निर्माण झाली असून यामागे असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी . असे बोलले जात आहे . तसेच या दुर्घटनेमुळे बांगलादेशातील पर्यटनस्थळांवरील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कॉक्स बाजार जिल्ह्यातील इनानी समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या टुपटुप रेस्टो अँड रिसॉर्टला सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. रिसॉर्टची तीन मजली इमारत प्रामुख्याने लाकडापासून बनवण्यात आली होती. त्यामुळे आगीने काही वेळातच संपूर्ण इमारतीला वेढले.
त्यावेळी अनेक पर्यटक खोल्यांमध्ये झोपले होते. काहींनी जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये आश्रय घेतला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. मात्र, अग्निशामक दल पोहोचेपर्यंत आतील अडकलेल्या १० जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . असे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे .
या दुर्घटनेनंतर रिसॉर्टच्या सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अग्निशमन विभागाने यापूर्वीच रिसॉर्टची तपासणी करून आगीचा धोका असल्याचा इशारा दिला होता. रिसॉर्टकडे आवश्यक अग्निसुरक्षा परवानाही नसल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीमध्ये पुरेशी अग्निशमन उपकरणे, अलार्म आणि आपत्कालीन बचावाची व्यवस्था नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी सूचना देऊनही रिसॉर्ट सुरू ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुर्घटनेनंतर पोलिसांनी रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थापकासह संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वयंपाकघरातील शेगडीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मृतांपैकी काहींची ओळख पटवण्यात आली असून, इतरांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणीची मदत घेतली जाणार आहे. या दुर्घटनेनंतर बांगलादेशातील पर्यटनस्थळांवरील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.






