Photo Credit-Social Media
क्वेटा : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम याठिकाणी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २८ जणांचा बळी गेला. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला ताजा असतानाच आता बलुच आर्मीने पाकिस्तानावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्तानमधील मार्गट परिसरात शुक्रवारी झालेल्या स्फोटक हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे किमान १० जवान ठार झाल्याची माहिती आहे. (Pahalgam Terror Attack)
या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) स्वीकारली असून, रिमोट-कंट्रोल्ड आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) चा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. बीएलएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या वाहनावर टार्गेटेड आयईडी हल्ला केला असून, वाहन पूर्णपणे नष्ट झाले आहे.” हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मार्गट हे बलुच बंडखोरीचे दीर्घकालीन केंद्र मानले जाते. येथे याआधीही अनेक वेळा सुरक्षा दलांवर हल्ले झाले आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी बीएलए ही गट अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करत आहे. या हल्ल्यावर अद्याप पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया किंवा विधान आलेले नाही. मात्र, परिस्थितीचा अंदाज घेता सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
बीएलएचचे (BLA) प्रवक्ते झियांद बलोच कडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. “कब्जा करणाऱ्या सैन्याविरुद्ध आमचे हल्ले पूर्ण ताकदीने सुरू राहतील.पाकिस्तानी (Pakistan) सैन्याच्या ताफ्यावर रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये शत्रूचे एक वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यातील सर्व १० सैनिक ठार झाले. मृतांमध्ये सुभेदार शहजाद अमीन, नायब सुभेदार अब्बास, शिपाई खलील, शिपाई जाहिद, शिपाई खुर्रम सलीम आणि इतर सैनिकांचा समावेश होता.” असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक; सैन्यदलेही सज्ज, आता काहीतरी मोठं घडणार?
बलुच लिबरेशन आर्मीची (BLA) स्थापना १९७० च्या दशकात झाली होती पण ही संघटना काही काळासाठी बंद पडली. २००० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला स्थापित केले. बलुचिस्तानमधील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांना एक वेगळा देश म्हणून राहायचे होते, परंतु त्यांच्या संमतीशिवाय त्यांना पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आले. बलुच लिबरेशन आर्मी सतत स्वातंत्र्याची मागणी करत आहे आणि पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएलएकडे ६००० हून अधिक लढाऊ आहेत, ज्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय मानली जाते.