अमेरिकेने पाठ फिरवल्यावर युक्रेनला ब्रिटनचा भक्कम पाठिंबा; 580 दशलक्ष डॉलर्सचे लष्करी मदत पॅकेज जाहीर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ब्रुसेल्स : जेव्हा अमेरिका युक्रेनच्या मदतीपासून माघार घेण्याच्या तयारीत आहे, तेव्हा ब्रिटनने युक्रेनच्या पाठिशी उभे राहत मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनने युक्रेनसाठी ५८० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४५० दशलक्ष पौंड) इतक्या भक्कम लष्करी मदतीची घोषणा केली आहे. या मदतीमुळे युक्रेनच्या संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, रशियाच्या आक्रमणाला अधिक ठोसपणे प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे.
ब्रुसेल्समध्ये नुकतीच झालेल्या युक्रेन संरक्षण संपर्क गटाच्या बैठकीनंतर ब्रिटनचे संरक्षणमंत्री जॉन हिली यांनी ही घोषणा केली. या बैठकीत नाटो आणि इतर युक्रेन समर्थक देशांचे संरक्षणमंत्री उपस्थित होते. हिली यांनी स्पष्टपणे सांगितले की, युक्रेनला मिळणारी ही मदत फक्त आर्थिक मदत नसून, शांततेसाठीचा एक निर्णायक टप्पा आहे.
रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालले असून, अजूनही कोणताही शांतता करार निश्चित झालेला नाही. मात्र त्याआधीच अनेक युरोपीय देश युक्रेनला संरक्षणात्मकदृष्ट्या मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. ब्रिटनच्या ४.५ अब्ज पौंडांच्या लष्करी मदत योजनेचा हा एक महत्त्वाचा भाग असून, यावर्षी युक्रेनला ३५० दशलक्ष पौंड तात्काळ उपलब्ध करून दिले जातील. त्याशिवाय नॉर्वे यामध्ये अतिरिक्त योगदान देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डॉलर घसरला! अमेरिकेन अर्थव्यवस्था धोक्यात, ट्रम्पची टॅरिफ योजना ठरतेय एक मोठे जागतिक संकट
Ukraine to receive $580 million in military support from Britain and Norway, — Reuters.
🇺🇦🇬🇧🇧🇻
Thank you so much pic.twitter.com/wGMIbpjDe1 — Olga Patlyuk 🇺🇦 (@OlgaPatl) April 11, 2025
credit : social media
या लष्करी मदत पॅकेजमध्ये रडार सिस्टम्स, अँटी-टँक माइन्स, आणि हजारो ड्रोन यांचा समावेश आहे. युक्रेनला वाहने आणि इतर उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठीही सहाय्य मिळणार आहे. यामुळे युक्रेन युद्धाच्या मैदानात केवळ टिकून राहणार नाही, तर आक्रमण करणाऱ्या रशियाच्या शक्तींचा प्रतिकारही सक्षमपणे करू शकेल. या मदतीमुळे युक्रेनच्या लष्करी यंत्रणेला नवसंजीवनी मिळणार आहे.
ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हिली यांनी युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे सांगितले की, “हे युद्ध विसरून शांततेचा दावा करता येणार नाही. युक्रेनला आता ताकद दिली नाही तर उद्या शांतता अपूर्ण राहील.” ते पुढे म्हणाले, “रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हे विनाशकारी युद्ध थांबवण्यास भाग पाडण्यासाठी युक्रेनच्या प्रतिकारशक्तीला बळकट करणे गरजेचे आहे.”
१० एप्रिल रोजी ब्रिटिश संरक्षण मंत्र्यांनी अनेक देशांच्या समकक्ष मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या बैठकीत युक्रेनसाठी भविष्यातील लष्करी आणि रणनीतिक सहकार्याची रूपरेषा तयार करण्यात आली. रशियाच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांचे एकत्र येणे ही काळाची गरज ठरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिका-चीन Tariff War घमासान; कोण घेणार माघार अन् वरचढ?
या संपूर्ण घडामोडींचा विचार करता, जेव्हा अमेरिका युक्रेनला मिळणाऱ्या मदतीतून माघार घेत आहे, तेव्हा ब्रिटनने उघडपणे पुढाकार घेतला आहे. हा निर्णय केवळ युक्रेनसाठीच नाही, तर युरोपमधील सामूहिक सुरक्षिततेचा आणि सामर्थ्याचा संदेशही आहे. या लष्करी मदतीमुळे युक्रेनला युद्धाच्या आघाडीवर उभे राहण्यासाठी नवसंजीवनी मिळेल आणि शांततेच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






