रशियाचा युक्रेनमधील भारतीय कंपनीवर हल्ला! व्हायरल पोस्टचे सत्य काय आहे? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
कीव/नवी दिल्ली : युक्रेनमधील रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एका धक्कादायक घटनेने भारतात चिंता निर्माण केली आहे. कीव शहरात असलेल्या कुसुम हेल्थकेअर या भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे व्हायरल होत आहेत. काहींनी हा हल्ला रशियाकडून जाणूनबुजून करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी याला युक्रेनच्या क्षेपणास्त्र चुकवण्याची चूक म्हटले आहे. या प्रकरणावर आता रशियन दूतावासाने अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, भारतीय कंपनीवर रशियाने हल्ला केल्याचे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत.
नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, रशियन सशस्त्र दलांनी १२ एप्रिल २०२५ रोजी कीवच्या पूर्वेकडील कुसुम हेल्थकेअरच्या फार्मसी गोदामावर कोणताही हल्ला केला नव्हता, ना त्यांनी अशी कोणतीही योजना आखली होती. रशियाच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी त्यांच्या लष्करी कारवाईचा उद्देश युक्रेनच्या लष्करी औद्योगिक संकुलातील विमान संयंत्र, लष्करी विमानतळांची पायाभूत व्यवस्था, आणि लष्करी असेंब्ली वर्कशॉप्स यांना लक्ष्य करण्याचा होता. दूतावासाच्या मते, रशियन सैन्य नागरी ठिकाणांवर हल्ला करत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : K2-18b ग्रहावर जीवनाचे संकेत; पृथ्वीपासून 700 ट्रिलियन मैल दूर ‘हेशियन वर्ल्ड’वर एलियन अस्तित्वाची शक्यता!
❗️In response to the accusations spread by the Embassy of Ukraine in India the Russian Embassy in New Delhi informs that the Russian Armed Forces did not attack or plan to attack on April 12, 2025, Kusum Healthcare’s pharmacy warehouse in the eastern part of Kiev. pic.twitter.com/W9HifHREnz
— Russia in India 🇷🇺 (@RusEmbIndia) April 17, 2025
credit : social media
हल्ल्यानंतर युक्रेनने रशियावर जाणीवपूर्वक भारतीय मालमत्तेवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. यामुळे भारत, रशिया आणि युक्रेन यांच्यात राजनैतिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कुसुम हेल्थकेअर ही युक्रेनमधील सर्वात मोठ्या भारतीय औषध कंपन्यांपैकी एक आहे. हल्ल्याच्या दिवशी या कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली आणि संपूर्ण संरचना जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कंपनीच्या उत्पादनावर आणि वितरक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
या हल्ल्यानंतर अनेक अहवालांमध्ये याला ड्रोन हल्ला म्हणूनही संबोधले गेले आहे. परंतु, अद्याप कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत माहिती उपलब्ध नाही. काही सुरक्षा विश्लेषकांच्या मते, युक्रेनचेच क्षेपणास्त्र चुकीच्या दिशेने डागले गेले असावेत, कारण यापूर्वीही युक्रेनमध्ये अशा चुकीच्या हल्ल्यांमुळे नागरी ठिकाणांवर नुकसान झाले आहे.
भारत सरकारने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने युक्रेनमधील भारतीय संस्थांबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे भारत सरकारवर दोन्ही देशांबरोबर सावधगिरीने संवाद साधण्याचा दबाव आहे. विश्लेषकांचे मत आहे की, युक्रेन युद्धाच्या वाढत्या तीव्रतेत अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Earthquake in Chile-Myanmar: म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भयानक भूकंप; काय आहे सद्यपरिस्थिती जाणून घ्या?
कुसुम हेल्थकेअरवरील हल्ला नेमका कोणत्या कारणाने आणि कोणाकडून झाला यावर अजूनही संभ्रम कायम आहे. रशिया आपल्यावर लावलेले आरोप फेटाळत असताना, युक्रेन त्यांच्यावर ठपका ठेवतो आहे. या घटनेने भारताच्या भूमिकेवर, रशिया-युक्रेन युद्धातील तटस्थतेवर आणि परकीय गुंतवणुकीवर नवा प्रश्नचिन्ह उभा केला आहे. आता पाहावे लागेल की, या हल्ल्याच्या चौकशीतून पुढे कोणते तथ्य समोर येते आणि भारत यावर कसा प्रतिसाद देतो.