Earthquake in Chile-Myanmar: म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भयानक भूकंप; काय आहे सद्यपरिस्थिती जाणून घ्या? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Earthquake in Chile-Myanmar : (17 एप्रिल 2025 ) पृथ्वीवरील tectonic प्लेट्सच्या हालचालीमुळे जगभरात भूकंपाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. 17 एप्रिल रोजी उत्तर चिली आणि म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर्मनीमधील प्रतिष्ठित भूकंपविज्ञान संस्था GFZ (German Research Centre for Geosciences) ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर चिलीमध्ये 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 178 किलोमीटर खोल होता. यामुळे या भूकंपाचे परिणाम तुलनेने सौम्य राहिले, मात्र भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
याच दिवशी, म्यानमारमध्येही 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. विशेष म्हणजे, या भूकंपाचा केंद्रबिंदू फक्त 10 किलोमीटर खोलीवर असल्यामुळे त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवले. याआधीही म्यानमारमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाल्याचे नोंदवण्यात आले होते. सलग भूकंपाच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. उथळ भूकंप अधिक घातक असतात, कारण ते जमिनीच्या पृष्ठभागाजवळ होतात आणि त्यांची ऊर्जा थेट जमिनीवर प्रक्षिप्त होते. त्यामुळे इमारतींना नुकसान होण्याचा धोका आणि जीवितहानीची शक्यता जास्त असते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Shooting: फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत गोळीबाराची भीषण घटना; दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी, कॅम्पस लॉकडाऊन
दोन्ही देशांमध्ये झालेल्या या भूकंपांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. चिली आणि म्यानमारमधील नागरिक मात्र अजूनही धास्तावलेले आहेत. सतत होणाऱ्या भूकंपांमुळे जनतेमध्ये मानसिक अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.
म्यानमार भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले जाते. हा देश युरेशियन आणि इंडो-ऑस्ट्रेलियन टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमारेषेवर स्थित असल्यामुळे, येथे दरवर्षी अनेक भूकंप नोंदवले जातात. आंतरराष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अहवालानुसार, 1990 ते 2019 दरम्यान, म्यानमार आणि त्याच्या परिसरात दरवर्षी सुमारे 140 भूकंप (3.0 रिश्टर किंवा अधिक तीव्रतेचे) नोंदवले गेले आहेत.
या सतत घडणाऱ्या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. भूकंपाच्या पूर्वसूचना प्रणाली, लोकजागृती मोहीम आणि इमारतींची संरचनात्मक मजबुती या बाबींवर अधिक भर दिला जाणे गरजेचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बेलीझमध्ये अमेरिकन माजी सैनिकाने विमानाचे केले अपहरण; धाडसी प्रवाशाच्या कृतीने अनेकांचे प्राण बचावले
या घटनांमधून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, निसर्गाच्या शक्तीपुढे माणूस कितीही तंत्रज्ञान प्रगत असला तरी असहाय्य ठरतो. त्यामुळे या संकटांना सामोरे जाण्यासाठी सतत तयारी ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. चिली आणि म्यानमारमधील नागरिकांनी सध्या सावधगिरी बाळगावी, तसेच स्थानिक प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना योग्य माहिती आणि मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.