Bangladesh News : ढाकाचे राजकारण ढवळून निघणार! शेख हसीनाचे पुनरागमन, मोहम्मद युनूस समोर नवे आव्हान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ढाका : बांगलादेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. देशाच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी लवकरच बांगलादेशात परतण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी ५ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्या हिंसाचारानंतर त्यांना ढाका सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. आता त्यांनी सत्ताधारी मोहम्मद युनूस यांच्या सरकारवर गंभीर आरोप करत परतल्यानंतर न्यायाची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.
हसीनांचे निर्वासन आणि पुनरागमनाचे संकेत
शेख हसीना या बांगलादेशच्या सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या पंतप्रधान आहेत. परंतु, ऑगस्ट २०२४ मध्ये देशातील निदर्शने आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना ढाका सोडून हेलिकॉप्टरने भारतात स्थलांतर करावे लागले. त्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. भारतामधून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात हसीना यांनी आपल्या समर्थकांना दिलासा देत म्हटले की, त्या लवकरच बांगलादेशात परततील आणि युनूस यांच्या बेकायदेशीर कृत्यांची चौकशी करून देशातील जनतेला न्याय मिळवून देतील. त्यांच्या या विधानामुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 48 ड्रोन रशियन सैन्याने पाडले; अमेरिकेत ट्रम्प-झेलेन्स्की भेटीत वादंग
युनूस सरकारवर गंभीर आरोप
हसीना यांनी आपल्या संदेशात मोहम्मद युनूस यांच्या सरकारवर कठोर टीका केली. त्यांच्या मते, युनूस यांनी दहशतवाद्यांना मोकळे हात दिले असून, त्यामुळे बांगलादेशात अराजकता माजली आहे. हसीनांच्या आरोपांनुसार, सरकारने देशातील विविध संस्था बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात घेतल्या असून, या संस्थांचा गैरवापर करून लोकशाहीला धोका निर्माण केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, परतल्यानंतर त्या या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करतील आणि देशातील कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करतील.
आगामी निवडणुकांसाठी हसीना सज्ज?
हसीना यांच्या पुनरागमनाच्या घोषणेमुळे बांगलादेशातील आगामी निवडणुकांबाबत नवे समीकरण निर्माण झाले आहे. त्या पुन्हा अवामी लीगचे नेतृत्व करून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. यामुळे मोहम्मद युनूस यांच्या सरकारला मोठे आव्हान मिळणार आहे. युनूस सरकारच्या कारभारावर जनतेतही असंतोष आहे. अनेक नागरिक आणि राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, हसीना यांची पुनरागमन घोषणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरू शकते.
बांगलादेशमध्ये नवा विद्यार्थी पक्ष उभारणीच्या तयारीत
बांगलादेशच्या राजकारणात आणखी एक मोठा बदल घडू शकतो. हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हा पक्ष आगामी निवडणुकांमध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. या नव्या पक्षामुळे बांगलादेशच्या राजकीय समीकरणात तिरंगी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे शेख हसीनांचा अवामी लीग पक्ष, दुसरीकडे मोहम्मद युनूस सरकार आणि तिसरीकडे नव्याने स्थापन होणारा विद्यार्थी पक्ष यांच्यात तीव्र राजकीय स्पर्धा पाहायला मिळू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगावर युद्धाची टांगती तलवार! रशियाचा गंभीर इशारा, होऊ शकते ‘अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये युद्ध’
बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता
शेख हसीना यांच्या पुनरागमनाच्या घोषणेमुळे बांगलादेशच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळू शकते. त्यांचे समर्थक या बातमीने उत्साहित झाले असून, देशात पुन्हा अवामी लीग सत्तेत येईल का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मोहम्मद युनूस यांचे सरकार या नव्या आव्हानाचा कसा सामना करेल आणि हसीना यांच्या पुनरागमनानंतर बांगलादेशच्या राजकारणाला कोणते नवे वळण मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.