फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. मिळालेय् माहितीनुसार, रस्ते अपघातात एका ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते. यामध्ये 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तर 13 जण जखमी असून त्यांना टियाफिलो ओटानी शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बसचा टायर फुटल्याने बस अनियंत्रित
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये सुमारे 45 प्रवासी प्रवास करत होते. बस साओ पाउलो येथून निघाली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसचा टायर फुटल्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि ती थेट ट्रकवर आदळली. या अपघातात एका कारलाही धक्का बसला, परंतु सुदैवाने त्या कारमधील तीन प्रवाशांचे प्राण वाचले.
ब्राझील राष्ट्रपतींनी दुःख व्यक्त केले
ब्राझीलच्या राष्ट्रपती लुइज इनासियो लुला दा सिल्वा यांनी या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना म्हटले की, “माझ्या मनाला खूप दुःख झाले आहे. या भीषण अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो.” ब्राझीलच्या परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार, यावर्षी देशभरात रस्ते अपघातांमध्ये 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंतेची बाब आहे.
ब्राझीलमध्ये वाढते अपघात
या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू केले. अग्निशमन विभागाने सांगितले की, अपघाताचा परिणाम इतका भयानक होता की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अनेक तास लागले. रस्ते अपघातांमध्ये वाढती मृत्यू संख्या ब्राझीलसाठी एक मोठे आव्हान आहे. अपघातांची कारणे शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक बनले आहे.
वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांची सुरक्षितता सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जाणे गरजेचे आहे. या घटनेने संपूर्ण ब्राझीलमध्ये शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी हा अपघात एक अमूल्य हानी असून, संपूर्ण देश त्यांच्या दुःखात सहभागी आहे. प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.