भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय इराणला जाऊ शकतील, फक्त ‘या’ 4 अटी पूर्ण कराव्या लागतील!

इराणने भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय भेट देण्याची परवानगी दिली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. जास्तीत जास्त १५ दिवस राहता येईल.

  नवी दिल्ली: इराणमध्ये (Iran) जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक आंनदाची बातमी आहे. इराणने मंगळवारी भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवायही (Visa) भेट देण्याची घोषणा केली. मात्र त्यांनी एक अटही समोर ठेवली आहे. केवळ विमानाने येणाऱ्या पर्यटकांनाच या सुविधेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ते जास्तीत जास्त 15 दिवस राहू शकतील.
  इराणच्या दूतावासाने सांगितले की, भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश ४ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यासाठी चार अटींचे पालन करावे लागेल. डिसेंबरमध्ये इराणने भारत आणि इतर ३२ देशांसाठी व्हिसामुक्त कार्यक्रम मंजूर केला होता. या 32 देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर आणि मलेशिया यांचा समावेश आहे.

  सहा महिन्यातून एकदा व्हिसाशिवाय जाता येईल

  इराणने म्हटले आहे की व्हिसा-मुक्त कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या देशांचे नागरिक त्यांच्या पासपोर्टसह येऊ शकतात. त्यांना सहा महिन्यांतून एकदा आणि जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी व्हिसाशिवाय येण्याची परवानगी दिली जाईल. 15 दिवसांचा हा अंतराल आणखी वाढवला जाणार नाही. ज्यांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे आहे त्यांना व्हिसा आणावा लागेल. इराणमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांनाच व्हिसाशिवाय येण्याची परवानगी असेल.

  विमानाने येणाऱ्यांनाच मिळणार सुविधा

  इराणने म्हटले आहे की ज्या भारतीयांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ यायचे आहे किंवा ज्यांना 6 महिन्यांत अनेक वेळा इराणला भेट देण्याची गरज आहे त्यांना दुसऱ्या प्रकारचा व्हिसा मिळविण्यासाठी भारतातील इराणी दूतावासाशी संपर्क साधावा लागेल. भारतीय पर्यटक केवळ हवाई मार्गाने व्हिसाशिवाय इराणमध्ये जाऊ शकतील. भारतीय नागरिकाला इराणला जाण्यासाठी जमीन किंवा जलमार्गाने व्हिसाची आवश्यकता असेल.
  गेल्या महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर इराणला गेले होते. या काळात त्यांनी अनेक द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर त्यांचे इराणचे समकक्ष होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांच्याशी विस्तृत चर्चा केली.