Israel Iran War News Marathi : इराण-इस्रायलमधील संघर्ष तीव्र होत चालला आहे. याच तमावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला होता. त्यांनी अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. परंतु याच दरम्यान इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, इराकमधील एन अल-असद या अमेरिकन लष्करी तळांवर इराणने तीन ड्रोन हल्ले केले आहेत. परंतु सर्व ड्रोन हल्ले यशस्वीरित्या रोखण्यात आणि निष्क्रिय करण्यात आले असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मात्र, या हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यापूर्वीच ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की, जर इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर किंवा सैन्यावर कोणतेही हल्ले केल्यास याचे वाईट परिणाम इराणला भोगावे लागतील. या धमकीनंतर हा हल्ला करण्यात आला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप हा हल्ला इराणने केला असल्याचे स्पष्ट झालेले नाही. सध्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले होते की, “शनिवारी (१४ जून) रात्री झालेल्या इराणवरील हल्ल्यात अमेरिकेचा काहीही संबंध नाही. यामुळे इराणने अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे हल्ला केल्यास अमेरिका त्याला पूर्ण ताकदीने उत्तर देईल, इराणने यापूर्वी हे कधीही पाहिले नसले.” इस्रायलच्या इराणी राजवटीच्या अण्वस्त्र प्रकल्पाशी संबंधित तेहरानमधील मुख्यालयांवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ही पोस्ट केली होती.
यापूर्वी इराणने अमेरिकेला इस्रायलला केलेल्या मदतीमुळे अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. अमेरिका गेल्या अनेक काळापासून इराणविरुद्धच्या संघर्षात इस्रायलला मदत करत आला आहे. यामुळे इराणने अमेरिकेसोबतची अणु चर्चा देखील रद्द केली आहे. दरम्यान इराकमधील अमेरिकन लष्करी तळांवरील हल्ला ट्रम्प यांच्या धमकीनंतर झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, किंवा नाकारलेली नाही. यामुळे या हल्ल्यात इराणचा हात असल्याचे मानले जात आहे.