इराण-अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसणार; तब्बल 30000000 लोक गरीब होणार
वॉशिंग्टन : कोणतेही युद्ध हे जगाला भारी पडतेच. परंतु त्याचा थेट परिणामी आर्थिक दुर्बल घटकांवर होत असतो. सध्या सुरू अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धही त्याला अपवाद नाही. या युद्धाला जगावर मोठा भार पडणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने तेल आणि वायूचे संकट अधिकच गडद झाले असून, हे युद्ध जगातील ३ कोटी लोकांना गरीबीच्या खाईत ढकलणार आहे, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रांचे विकास प्रमुख अलेक्झांडर डी क्रू यांनी दिला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात ५० दिवसांहून अधिक काळ चाललेल्या युद्धात सध्या युद्धविराम सुरू असला तरी, जागतिक तणाव कायम आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये तेल आणि वायूच्या संकटाच्या रूपात या युद्धाचा परिणाम दिसून आला. या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रांच्या विकास प्रमुखांनी हा गंभीर इशारा दिला आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अंदाजे ३ कोटी लोक गरिबीत लोटले जाऊ शकतात. या संघर्षाच्या अप्रत्यक्ष परिणामांमुळे येत्या काही महिन्यांत अन्न असुरक्षितता वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मालवाहू जहाजांवर सुरू असलेल्या नाकेबंदीमुळे केवळ इंधनावरच नव्हे, तर खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. परिणामी, कृषी उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. पिकांच्या उत्पन्नावरील हा परिणाम या वर्षाच्या उत्तरार्धात स्पष्टपणे दिसून येईल. अमेरिका आणि इराण यांच्यातील हे युद्ध उद्या संपले तरी, त्याचे आधीच दिसणारे परिणाम कायम राहतील, ज्यामुळे जगभरातील ३० दशलक्ष किवा त्याहून अधिक लोक संभाव्यतः गरिबीत ढकलले जातील.
काही महिन्यांत अन्नसुरक्षेचा अभाव
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या इशाऱ्यानुसार भारत, बांगलादेश, श्रीलंका, सोमालिया, सुदान, टांझानिया, केनिया आणि इजिप्त यांसारख्या देशांना सर्वाधिक धोका. येत्या काही महिन्यांत अन्नसुरक्षेचा अभाव मोठ्या प्रमाणावर पसरेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याबद्दल फार काही करता येणार नाही.
जीडीपीवर दबाव, जग संकटात
इराण युद्धाच्या परिणामामुळे जागतिक जीडीपीच्या ०.५% ते ०.८% भागाचे नुकसान झाले आहे. जे काही उभारण्यासाठी अनेक दशके लागतात, ते नष्ट करण्यासाठी आठ आठवड्यांचे अमेरिका-इराण युद्ध पुरेसे होते, असे मत संयुक्त राष्ट्र विकास आयोगाचे (यूएनडीपी) प्रमुख डी क्रू यांनी म्हटले आहे. हे युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाले, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणच्या प्रत्युत्तरानंतर, जगाची जीवनरेखा असलेले तेल आणि वायूचे मार्ग बंद झाले आणि ऊर्जेसह जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी विस्कळीत झाली.






