Iran US Conflict: 'दादागिरीची किंमत मोजावी लागेल...' होर्मुझवरून इराणचा एल्गार; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण आक्रमक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी अमेरिकेवर कराराचे उल्लंघन आणि सातत्याने धमक्या दिल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धमकावण्याचे आणि वचन मोडण्याचे परिणाम अमेरिका अजून समजलेली नाही. जर आमच्यावर हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तर नक्की दिले जाईल. होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकेच्या दबावामुळे नव्हे, तर इराणच्या व्यवस्थेद्वारेच खुली राहील.” मंगळवारी होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तीन जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणमधील विविध भागांवर हवाई कारवाई केल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चाबहार, कोनारक, अबू मुसा बेट, बंदर अब्बास आणि सिरिक परिसरात अनेक स्फोट झाले. काही बंदरे आणि सागरी वाहतूक नियंत्रण सुविधांचेही नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. चाबहारमधील एका रुग्णालयाजवळही शस्त्रास्त्रांचा मलबा पडल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran War 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेने पेटले युद्ध; चाबहार बंदरासह इराणच्या 90 तळांवर अमेरिकेचा भीषण बॉम्बहल्ला
हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आगीच्या ज्वाळांचा फोटो शेअर करत इराणला कठोर इशारा दिला. त्यांनी म्हटले की, जहाजांवरील हल्ल्याला हे प्रत्युत्तर असून, भविष्यात अशा कोणत्याही कारवाईला अमेरिकेकडून अधिक कठोर प्रतिसाद दिला जाईल. दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी ट्रम्प यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत इराण आपल्या सार्वभौमत्वाचे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आयआरजीसी (IRGC) नेही अमेरिकेला कोणत्याही पुढील हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
Iranian Parliament Speaker Mohammad Bagher Ghalibaf has warned the US on its recent strikes, along with US pressure over the Strait of Hormuz, saying it would only open through “Iranian arrangements”, not “American threats.” 🔴 LIVE updates: https://t.co/5sgghADI9o pic.twitter.com/vojCiSUR1U — Al Jazeera English (@AJEnglish) July 9, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Australia Agreement: भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना नवे बळ; अणुऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक करार
दरम्यान, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कतारमध्ये नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कुवेतमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे सतर्क करण्यात आली आहे. कुवेती अधिकाऱ्यांनी अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ ठरवल्याचा दावा केला आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजार, समुद्री व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक होत असल्याने, या भागातील कोणतीही लष्करी चकमक जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरू शकते.






