Iran-US War : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात; अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर दबाव टाकण्यासाठी हल्ले केले जात आहेत. याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या युद्धाला काही दिवसांचा युद्धविराम मिळाला आहे. तर दुसरीकडे, शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या पार्श्वभूमीवर, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दाखल झाले आहेत. अराघची हे अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत.
पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये दाखल झाले. या भेटीमुळे तणाव कमी होऊन या प्रदेशात शांतता प्रस्थापित होण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. परराष्ट्र मंत्री अराघची यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांच्यासह एक छोटे शिष्टमंडळ आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अराघची पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर यांची भेट घेणार आहेत. ते अमेरिकी अधिकाऱ्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर, इराणी शिष्टमंडळासोबत थेट चर्चेसाठी शनिवारी पाकिस्तानला भेट देणार आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी याला दुजोरा दिला आहे.
इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नाही : डोनाल्ड ट्रम्प
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. हे युद्ध थांबावं, अशीच सर्वांची इच्छा आहे. असे असताना अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नसल्याचे म्हटले.
हिंद महासागरात आणखी एक इराणी टँकर जप्त केल्याचा दावा
दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने हिंद महासागरात तेल तस्करीशी संबंधित आणखी एक इराणी टँकर जप्त केल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. यापूर्वी, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन मालवाहू जहाजांवर हल्ला केला होता.






