फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बेरुत: इस्रायल- हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे.लेबनॉनमधील टायर भागात इस्रायलने रविवारी जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच उत्तरी गाझामध्ये देखील इस्त्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाचा मुख्य प्रवक्ता मोहम्मद अफिफ याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
हिजबुल्लाह प्रमुख मोहम्मद अफिफ ठार
इस्त्रायलच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद अफिफ हिजबुल्लाचा प्रमुख नेता हसन नसराल्लाह ठार झाल्यानंतर हिजबुल्लाची भूमिका स्पष्ट करत होता. मात्र, इस्रायली सैन्याच्या या कारवाईमुळे हिजबुल्लाला मोठा धक्का बसला आहे. अफिकच्या हत्येपूर्वीच हिजबुल्लाहने नेतन्याहूंच्या घरावर हल्ले केले होते. तसेच याआधी देखील नेतन्याहूंच्या खाजगी निवासस्थानावर हल्ला केला होता. याची जबाबदारी हिजबुल्लाहने घेतली होती. यामुळे इस्त्रायलने अफिकचा खात्मा करून नेतन्याहूंवरील हल्ल्याचा बदला घेतला.
इस्त्रायलचे लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच
याशिवाय, इस्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनमधील टायर भागावरही जोरदार हल्ले केले. या हल्ल्यात 11 लोकांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत. इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. इस्रायलने स्पष्ट केले की, त्यांनी हिजबुल्लाहच्या दहशतवादी लक्ष्यांवरच कारवाई केली आहे. नागरिकांना हानी पोहचवण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नाही.
उत्तरी गाझामध्ये देखील इस्त्रायलची लष्करी कारवाई
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर गाझामध्ये देखील इस्रायली हवाई हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 जण ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लोक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. याशिवाय, गाझा पट्टीतही इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर हिजबुल्लाने रॉकेट आणि ड्रोन हल्ले केल्याने इस्रायलने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
नागरिकांमध्ये भितीचे वातावारण
नेतन्याहू यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलचा संताप वाढला असून त्यांनी हिजबुल्ला आणि गाझा पट्टीतील दहशतवाद्यांवर जोरदार हल्ले सुरू ठेवले आहेत. नागरिकांनी या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षिततेसाठी घरांची गावे सोडण्यास सुरुवात केली आहे.संपूर्ण मध्य पूर्वेत या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रायल-हिजबुल्ला संघर्ष भविष्यात किती गंभीर वळण घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.