Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, आज रविवारी (२८ डिसेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा हा ११ जानेवारी २०२६ रोजी, तर तिसरा टप्पा २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी घेण्यात येत आहेत. परंतु याला मानवाधिकार संघटना, विरोध पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने विरोध केला आहे. सध्या मान्यानमारमध्ये लष्कराच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदान पार पडत आहे.
अनेक भागांमध्ये लष्कराकडून मतदानावर थेट देखरेख केली जात आहे. लष्कर निवडणूक प्रक्रियेवर टीका करणाऱ्यांना थेट अटक करत आहे. तसेच यासाठी विशेष कायदे देखील लागू करण्यात आले आहेत. हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष आणि मानवाधिकार संघटना, आंतरराष्ट्रीय समुदयाने लष्कर निवडणूकांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. या निवडणुकांमध्ये लष्कराचा पाठिंबा असलेल्या पक्षांचे वर्चस्व प्रस्थापित होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान म्यानमानचे माजी सरकारच्या आंग सान सू यांच्या नॅशनल डेमोक्रॅसी (NLD) पक्ष बरखास्त करण्यात आला आहे. यामुळे निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त नसल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे.
म्यानमारमध्ये गेल्या पाच वर्षांपासून गृहयुद्ध सुरु आहे. सततच्या युद्धामुळे म्यानमारमधील अनेक भागांमध्ये मतदान होऊ शकलेले नाही. सीमावर्ती प्रदेश, ग्रामीण भाग आणि संघर्षग्रस्त क्षेत्रांमधील निवडणुका लष्कराने रद्द केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात विद्रोही गट आणि लष्करातील युद्धामुळे म्यानमाध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या निवडणुकांना विरोध केला जात आहे. अमेरिका आणि अनेक पाश्चिमात्य देशांनी या निवडणुकांना मान्यता देण्यास नकार दिला आहे. जपान, मलेशिया यांसारख्या आशियाई देशांनी देखील टीका केली आहे. सध्या गृहयुद्धाच्या काळात निष्पक्ष निवडणुका म्यानमारमध्ये पार पडतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






