फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेत H-1B व्हिसावरुन पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद उभारला आहे. अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी पूर्वी या वादाला तोंड फुटले आहे. उच्च कौशल्य असलेल्या परदेशी कामगारांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी देणाऱ्या या प्रकल्पामुळे डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये असामान्य एकत्रीकरण झाले आहे. डावेपंथी नेते बर्नी सॅंडर्स आणि उजवेपंथी स्टीव्ह बॅनन यांनी या प्रकरणावर उघडपणे तीव्र टीका केली आहे.
सॅंडर्सची टीका आणि मस्कचा बचाव
सीनेटर बर्नी सॅंडर्स यांनी H-1B व्हिसा प्रोग्रामवर टीका करत म्हटले की, “याचा हेतू सर्वोत्तम कौशल्य असलेल्या लोकांना आणणे नाही, तर कमी पगारावर परदेशी कामगार नेमणे आहे.” त्यांनी एलॉन मस्क यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांच्या कंपन्या, जसे की टेस्ला आणि स्पेसएक्स, स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून परदेशी कामगारांना कमी पगारात नियुक्त करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनच्या बाजारपेठेत भीषण आग; 8 जणांचा जळून मृत्यू, 15 जखमी
टेस्लाने 7,500 अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढून कमी वेतनावर H-1B वर्कर्स नियुक्त केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एलॉन मस्क यांनी याचा प्रतिवाद करत म्हटले की, “H-1B व्हिसा कार्यक्रमामुळे स्पेसएक्स आणि टेस्लासारख्या कंपन्या उभ्या राहिल्या, यामुळे अमेरिका मजबूत बनला आहे.” मस्क यांनी यावर अधिक गुंतवून सांगितले की, परदेशी कामगारांमुळे देशाला अभूतपूर्व यश मिळाले आहे.
उजव्याविचारसरणींचे मतभेद
उजव्या विचारसरणीचे राजकीय नेते स्टीव्ह बॅनन यांनी H-1B वर टीका करत म्हटले आहे की, “अमेरिकन कर्मचाऱ्यांना डावलून परदेशी कामगारांना प्राधान्य देणे चुकीचे आहे.” या मुद्द्यावरून ट्रम्प समर्थकांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने पूर्वी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता, परंतु आता त्यांच्या गटामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
H-1B व्हिसाचा वाद
H-1B व्हिसा परदेशी कामगारांना तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र क्षेत्रात काम करण्यासाठी परवानगी देतो. मात्र, टीकाकारांचा आरोप आहे की कंपन्या स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांमधून काढून परदेशी कामगारांवर कमी खर्च करण्याचा मार्ग शोधत आहेत. या कार्यक्रमाने डावेपंथी आणि उजवेपंथी या दोन्ही गटांना एकाच मुद्द्यावर आणले आहे – अमेरिकन कामगारांना प्राधान्य देणे. अमेरिकेतील कौशल्य विकास व शिक्षणासाठी अधिक गुंतवणूक करण्याचा सॅंडर्स यांचा आग्रह आहे. यामुळे या मुद्द्याचा राजकीय आणि सामाजिक परिणाम अजूनही गाजत आहे.