पाकिस्तान सरकार पॅलेस्टाईनचे हित बाजूला ठेवून इस्रायलशी नवे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबाद : पाकिस्तानने पॅलेस्टाईनच्या लढ्याला नेहमीच पाठिंबा दर्शवला असल्याचा दावा केला असला तरी, अलीकडच्या घडामोडींनी पाकिस्तानच्या या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इस्रायलसोबत पाकिस्तानच्या वाढत्या गुप्त संबंधांमुळे पॅलेस्टाईनच्या समर्थकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः, पाकिस्तानच्या ११ पत्रकारांच्या इस्रायल दौऱ्याने या संशयास अधिक बळकटी दिली आहे.
गाझातील मुस्लिमांविरोधात पाकिस्तानचा इस्रायलशी गुप्त करार?
अमेरिकेच्या परकीय मदतीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान इस्रायलसोबत राजनैतिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे, असे बोलले जात आहे. यामुळे पॅलेस्टाईनच्या हिताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, पाकिस्तानने इस्रायलशी कोणता गुप्त करार केला आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अलीकडे, पाकिस्तानातील ११ पत्रकारांनी एका एनजीओच्या माध्यमातून इस्रायलला भेट दिली. त्यांनी इस्रायल सरकारसोबत संवाद साधत गाझातील हमासच्या हल्ल्यांबाबत चर्चा केली. इतकेच नव्हे, तर इस्रायलच्या धोरणांचे समर्थन करणाऱ्या मतप्रदर्शनामुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दुबईच्या राजघराण्यात जन्मलेल्या नवजात राजकुमारीचे नाव ‘हिंद’ का ठेवले? वाचा यामागचे रंजक कारण
पाकिस्तान सरकारने दिले पांढरपेशी स्पष्टीकरण
पाकिस्तानी पत्रकारांच्या या दौऱ्यावर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले. मात्र, सरकारच्या उत्तराने अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण केले. पाकिस्तानने आधीच्या काही घटनांमध्ये इस्रायलला भेट देणाऱ्या पत्रकारांवर कठोर कारवाई केली होती. मात्र, या ११ पत्रकारांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सरकारच्या गुप्त संमतीचा संशय अधिक बळावला आहे. जर पाकिस्तान सरकार पॅलेस्टाईनच्या बाजूने असेल, तर या पत्रकारांना इस्रायल दौऱ्याची परवानगी कशी मिळाली? हा प्रश्न विचारला जात आहे. यावरून पाकिस्तान आता इस्रायलसोबत नवे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट होते.
अमेरिकेच्या दबावातून इस्रायलशी गुप्त वाटाघाटी?
अमेरिकेकडून मिळणारी परकीय मदत कमी झाल्याने पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तान इस्रायलशी संबंध सुधारण्याचा गुप्त अजेंडा राबवत आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील घनिष्ठ संबंध लक्षात घेता, पाकिस्तान इस्रायलसोबत वाटाघाटी करून स्वतःच्या हितसंबंधांना प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट दिसते.
हे वास्तव समोर आल्यानंतर, पाकिस्तान सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पाकिस्तानने अनेक वर्षे पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला पाठिंबा दिला. परंतु, आता पाकिस्तानने आपली मूळ भूमिका सोडून इस्रायलच्या जवळ जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे, अशी टीका अनेक राजकीय विश्लेषकांकडून केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : France Poker 2025 : फ्रान्स युद्धासाठी सज्ज! काय आहे लष्कराचा पोकर 2025?
पाकिस्तानच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय संशय
या घडामोडींमुळे पॅलेस्टाईन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा हा बदललेला दृष्टिकोन मुस्लिम देशांमध्ये नाराजी निर्माण करू शकतो. पॅलेस्टाईनच्या संघर्षाचा केवळ राजकीय फायद्यासाठी पाकिस्तानकडून वापर होत आहे का? हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे. पाकिस्तानचा हा गुप्त करार आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणार असून, मुस्लिम जगतात पाकिस्तानच्या निष्ठेबद्दल संशय निर्माण झाला आहे. शेवटी, पाकिस्तानने पॅलेस्टाईनच्या समर्थनाचे केवळ नाटक केले होते का? हा प्रश्न आता जागतिक राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.