Free Trade Ready : भारत झुकणार नाही! ट्रम्पच्या 50% टॅरिफवर पियुष गोयल ठाम; अमेरिकेला दिला कठोर संदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Piyush Goyal tariff response : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ (कर) लादण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर दिल्ली-मॉस्को-व्हाईट हाऊस या त्रिकोणात तणाव वाढला आहे. 27 ऑगस्टपासून लागू झालेल्या या टॅरिफवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारत सरकारने स्पष्ट संदेश दिला आहे की ते अमेरिकेच्या दबावापुढे “कधीही झुकणार नाही”. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य करताना सांगितले की भारत आता पर्यायी बाजारपेठा शोधेल, निर्यातीला चालना देईल आणि स्वावलंबनाच्या मार्गाने अधिक मजबुतीने पुढे जाईल.
पत्रकार परिषदेत बोलताना पियुष गोयल म्हणाले, “भारत नेहमीच मुक्त व्यापार करारासाठी तयार आहे, पण आम्ही दबावाखाली कधीही निर्णय घेणार नाही. भारत अमेरिकेच्या करापुढे झुकणार नाही, उलट आम्ही नवीन बाजारपेठा काबीज करून निर्यातीला नवसंजीवनी देऊ. या वर्षी २०२४-२५ च्या आकड्यापेक्षा भारताची निर्यात अधिक होईल, याची मला खात्री आहे.”
गोयल यांनी संकेत दिला की केंद्र सरकार लवकरच निर्यातदारांना दिलासा देणाऱ्या नव्या धोरणात्मक घोषणा करणार आहे. “आमचे उद्दिष्ट स्वदेशी उत्पादन वाढवणे, जागतिक बाजारात भारताची मजबूत छाप निर्माण करणे आणि कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणे आहे,” असेही ते म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saffron Shawl : मोदी इफेक्ट! आता असीम मुनीरला कोणी ओढवली भगवी शाल? पाकिस्तानच्या फील्ड मार्शलचा VIDEO VIRAL
अमेरिकेचा हा निर्णय रशियावर दबाव आणण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी केले. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने भारतावर कर लादून अप्रत्यक्षपणे मॉस्कोला आर्थिक धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भारताने हा दबाव मान्य न करता स्वदेशी मार्ग स्वीकारण्याचे ठरवले आहे.
या कर निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंध पुन्हा तणावपूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली झुकणार नाही. आम्ही स्वदेशी मोहीम राबवून आपल्या देशाला अधिक सामर्थ्यवान बनवू.” अमेरिकेचा उद्देश भारताशी अधिक फायदेशीर व्यापार करार करणे हा असला तरी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे न्याय्य करार होईल तरच चर्चेसाठी तयार, अन्यथा नाही.
भारताने गेले काही वर्षे निर्यातीत उल्लेखनीय वाढ केली आहे. औषधनिर्मिती, आयटी, कृषी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रात भारताची आंतरराष्ट्रीय उपस्थिती मजबूत झाली आहे. पियुष गोयल यांच्या वक्तव्यामुळे भारतीय उद्योगविश्वालाही आत्मविश्वास मिळाला आहे. हा संदेश केवळ अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला आहे भारत आता कोणत्याही जागतिक शक्तीच्या दबावाखाली जाणारा देश नाही. उलट, स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर जगात नवे बाजारपेठा मिळविण्याची ताकद भारताकडे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL: ट्रम्प मरणार? ‘सिम्पसन’चे भाकित आणि राष्ट्राध्यक्ष बेपत्ता, सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ, व्हाईट हाऊस चिंतेत
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर हल्ल्यामुळे भारत-अमेरिका संबंधात वादळी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र पियुष गोयल यांच्या ठाम विधानामुळे भारताची भूमिका स्पष्ट झाली आहे “भारतातील उद्योग, निर्यातदार आणि जनता एकत्र उभी राहील, स्वदेशी उत्पादन वाढवेल आणि कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही.” हे केवळ आर्थिक प्रश्न नाही, तर भारताच्या आत्मसन्मानाशी निगडित आहे.