फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कीव: रशिया युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. आता रशियाने युद्धाची रणनीती बदलली अधिक आक्रमक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या अनेक भागांमध्ये काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 188 ड्रोन सोडले आहेत. यामुळे युक्रेनच्या हवाई दलाला गंभीर नुकसाने झाले असून अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र, युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई दलाने यापैकी बहुतेक ड्रोन नष्ट केले आहेत.
युक्रेनच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान
जरी युक्रेनने काही ड्रोन नष्ट केले असले, तरीही युक्रेनच्या अनेक भागांमध्ये अपार्टमेंट इमारती, राष्ट्रीय पॉवर ग्रीड आणि अन्य महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये 17 भागांना लक्ष्य करण्यात आले, मात्र या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. रशिया गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या नागरी भागांवर ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि ग्लाइड बॉम्बसारख्या शस्त्रांचा वापर करत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत.
हल्ल्यांमुळे नागरी जनतेचे जीवनमान विस्कळीत
युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले आहे की, नागरी क्षेत्रांना लक्ष्य करून रशिया युक्रेनच्या मनोबलावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सीमेजवळील रशियन प्रदेशात रशियाने 39 युक्रेनियन ड्रोन नष्ट केले. कीवमध्ये हवाई हल्ल्यांचा इशारा तब्बल सात तासांपेक्षा जास्त काळ सुरु होता, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यांमुळे नागरी जनतेचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
रशियाची चाणाक्ष रणनीती
गेल्या 24 तासांत सुमारे 1,000 किलोमीटर लांब आघाडीवर मोठ्या चकमकी घडल्या आहेत. डोनेस्तक प्रदेशातील पोकरोव्स्क आणि कुराखोव्हजवळ विशेषतः लढाई तीव्र झाली आहे. युक्रेनच्या सैन्याने मोठ्या प्रतिकाराची तयारी केली आहे, मात्र रशियाने आपली रणनीती अधिक चाणाक्षपणे बदलल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. पाश्चिमात्य लष्करी विश्लेषकांचे मत आहे की रशियन सैन्याने गेल्या वर्षभरात युद्धभूमीवर आपला दबदबा वाढवला आहे. विशेषतः पूर्व डोनेस्तक प्रदेशात रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.
पाश्चिमात्य देशांची युक्रेनला तातडीची मदत
रशियाचा हा आक्रमक पवित्रा युक्रेनसाठी मोठे आव्हान ठरत आहे. युक्रेनवर होणाऱ्या या सततच्या हल्ल्यांमुळे नागरी जीवन कोलमडले आहे. ऊर्जा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्यामुळे थंडीच्या दिवसांत नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला तातडीची मदत करण्याची गरज अधोरेखित होते. रशिया-युक्रेन युद्धाचे हे टप्पे अधिक गंभीर होत चालले असून शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता क्षीण होत आहे.