संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संयुक्त राष्ट्र(UN) दरवर्षी एक अशी यादी प्रसिद्ध करते, ज्यामध्ये युद्ध, संघर्षाच्या काळात सामान्य नागरिकांवर सामूहिकपणे लैंगिक अत्याचार करणाऱ्या सरकारी, बिगर-सरकारी संघटनांचा समावेश असतो. यामद्ये आतापर्यंत सुदान, हौथी, कॉंगो, म्यानमार, सीरिया यांसारख्या देशांतील अशा संघटनाचा समावेश आहे. आता यामध्ये रशिया आणि इस्रायलचेही नाव जोडले गेले आहे.
UN ने इस्रायल(Israel)वर वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. अहवालानुसार, इस्रायलच्या सैन्याचा २०२३ पासून १४ पुरुष, ९ मुले, ७ महिला आणि १ एका चिमुकल्यामुलीलवर अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये लैंगिक हिंसाचाराला छळाचे शस्त्र म्हणून वापरले असल्याचा आरोप आहे. इस्रायलने मात्र, या अहवालाला फेटाळले असून निरर्थक आणि लाजिरवाणा असल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे रशियावर देखील युक्रेनच्या नागरिकांचा अमानुष छळ केल्यचा आरोप आहे. या संदर्भात तब्बल ३१० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांवरही ३१ प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचाराचे आरोप ठोठवण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गेल्या वर्षी दोन्ही देशांना कडक इशारा दिला होता. दोन्ही देशांनी आपल्या लष्करी व्यवस्थेत सुधारणा न केल्यास त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. परंतु दोन्ही देशांच्या सैन्यांकडून सामान्यांचा अमानुष छळ सुरुच राहिला. यामुळेचे संयुक्त राष्ट्राने हे कठोर पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.






