पुण्यात टोळीयुद्धाची धग; आधी जीवघेणा हल्ला केला अन् नंतर संशय येऊ नये म्हणून कपडे बदलले (संग्रहित फोटो)
पुणे : टोळी युद्धाच्या संघर्षातून तिसऱ्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींनी हल्ल्यानंतर नवीन कपडे खरेदी करून पसार झाले. मात्र, कपडे खरेदी करताना दुकानातील बोलणे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. विशेष म्हणजे या कपड्याचे बिल एका त्रयस्थ व्यक्तीने दिले आहे. त्याचा शोध आता घेतला जात आहे.
याप्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या आरोपी अमन ऊर्फ लाला फारूख बागवाले (वय २१), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, दोघे रा. भवानी पेठ), आवेज आशपाक शेख (वय २६, रा. गणेश पेठ), ऋषीप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. नाना पेठ), आफताब शरीफ सय्यद (वय २२, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्यासह आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू तुषार निरंजन वाडेकर आणि स्वराज निरंजन वाडेकर, अमित बहादूरकर आणि स्वप्नील बहादूरकर यांच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. आरोपींच्या हल्ल्यात अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
हल्ला केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी आरोपी एका दुकानात गेले होते. या दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण व त्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या आरोपींच्या आवाजाचे विश्लेषण सुरू आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी आणि दुकानात आरोपी आवेज शेख मोबाईलवर बोलताना दिसत असून, हा मोबाईल जप्त करायचा आहे. आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संभाषण केले असून, सोशल मीडियाचे तपशील सांगण्यास टाळाटाळ करत आहेत.
आरोपींनी हल्ला करण्यापूर्वी अक्षयवर ठेवली होती पाळत
आरोपींनी हल्ला करण्यापूर्वी अक्षयवर पाळत ठेवली होती. ते गुन्हा करण्यापूर्वी कुठे जमले होते आणि कसे पळाले, या अनुषंगाने गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना करायची आहे. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली विना क्रमांकाची दुचाकी कोणाकडून आणली होती, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी निरीक्षक संतोष जाधव आणि सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.






