फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मास्को: अमेरिकेने युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिल्यानंतर रशिया संतप्त झाला होता. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी देखील या क्षेपणास्त्रांचे प्रत्युत्तर म्हणून अणवस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली होती. ही धमकी दिल्यानंतर रशियाने दोन महिन्यांपूर्वी 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात युक्रेनच्या डेनिप्रो शहरावर हापरसॉनिक मिसाइल हल्ला केला होता.
रशियाने दावा केला होता की, हे मिसाइल अतिशय ताकदवान आणि अचूक आहे. स्वत: व्लादिमिर पुतिन यांनी याचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की, हे मिसाइल हायपरसॉनिक मिसाइल असून हे दुसऱ्या कोणत्याही देशाकडे नाही. मात्र, या मिसाइबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुतिनच्या दाव्यांचा पर्दाफाश
एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे मिसाइल केवळ पश्चिमी देशांना घाबरविण्याचा पुतिन यांचा एक प्रचारात्मक प्रयत्न होता. या अहवालानुसार, रशियातील अंतर्गत सूत्रांनीच पुतिनच्या दाव्यांची पोल उघडली आहे. अहवालानुसार, ओरेशनिक मिसाइल धोकादायक नसल्याचे रशियाच्या एक अधिकाऱ्याने म्हटले आहे.
युक्रेनला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवण्याची क्षमता या मिसाइलमध्ये नसल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. हे रशियाचे केवळ प्रचाराचे साधन होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले की, रशियाने ही मिसाइल केवळ सामरिक धाक निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला. मात्र, या अधिकाऱ्याचे नाव व इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अमेरिकेला आणि ब्रिटनला घाबरविण्याचा डाव
या अहवालानुसार, अमेरिकेने आणि ब्रिटनने युक्रेनला रशियाविरुद्ध लांब पल्ल्याच्या मिसाइलांचा वापर करण्यास परवानगी दिली होती. याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ओरेशनिक मिसाइल हल्ल्याची योजना आखली. रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युरोप आणि अमेरिकेला घाबरवून युक्रेनला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, हा या कृतीमागील उद्देश होता.
पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे
रशियाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, युक्रेनवरील ओरेशनिक मिसाइल हल्ला मुख्यतः सोशल मीडिया आणि परदेशी माध्यमांवर दाखवण्यासाठी होता. या मोहिमेचा उद्देश पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे होता. अहवालात असेही म्हटले आहे की, रशियन प्रवक्त्याला पुतिनच्या आयसीबीएम हल्ल्याबाबत मौन बाळगण्यासाठी केलेला फोनसुद्धा या प्रचार मोहिमेचाच भाग होता.
या अहवालामुळे पुतिन आणि रशियाच्या लष्करी दाव्यांबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. ओरेशनिक मिसाइल हा फक्त प्रचाराचा भाग होता, ज्याचा उपयोग पाश्चिमात्य देशांना घाबरविण्यासाठी करण्यात आला. वास्तविकता मात्र या दाव्यांपेक्षा खूप वेगळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.