रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींसोबत करणार विविध मुद्यांवर चर्चा
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. भारतात विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष भेटी देताना दिसत आहे. असे असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात येणार आहेत. शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रतिनिधीमंडळ पातळीवरील शिखर परिषद होणार आहे.
पुतिन यांच्या दौऱ्यापूर्वी रशियन मंत्रिमंडळाने नागरी अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारतासोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) मंजूर केला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीदरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांमधील शिखर परिषद संरक्षण संबंध मजबूत करणे, बाह्य दबावापासून द्विपक्षीय व्यापाराचे संरक्षण करणे आणि छोट्या अणुभट्ट्यांवर सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा
रशियन माध्यमांनुसार, तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पात अनेक अणुभट्ट्या बांधणारी रशियन अणु कंपनी रोसाटॉमला संबंधित भारतीय संस्थांसोबत या करारावर स्वाक्षरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शिखर परिषदेत अनेक नवीन प्रस्ताव सादर होणार?
रशियन राष्ट्रपती कार्यालयाकडून काही महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. त्यामध्ये रोसाटॉमचे सीईओ अलेक्सी लिगाचेव्ह दिल्लीतील शिखर परिषदेत अनेक नवीन प्रस्ताव सादर करतील. यामध्ये लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या (एसएमआर) च्या विकासात सहकार्य समाविष्ट असणार आहे.
मोदी-पुतिन यांचं एकत्र डिनर
पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आगमनानंतर काही तासांनी त्यांच्यासाठी जेवणाचे आयोजन करतील. अमेरिकेशी बिघडत चाललेल्या संबंधांमध्ये, भारत रशियासोबतचे द्विपक्षीय धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
आर्थिक सहकार्य करारांवर स्वाक्षरी होणार
रशियन वृत्तसंस्था TASS ने क्रेमलिनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीदरम्यान, २०३० पर्यंत भारत आणि रशियामधील धोरणात्मक आर्थिक सहकार्याच्या क्षेत्रांच्या विकासासाठी एका योजनेवर स्वाक्षरी केली जाईल, असे म्हटले आहे.
संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत S-५०० वर चर्चा होणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे रशियन समकक्ष आंद्रेई बेलोसोव्ह रशियाकडून S-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी, सुखोई-३० विमानांचे अपग्रेड आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रगत आवृत्तीवर काम करण्यावर चर्चा करतील. त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांसाठी विशेष असा ठरणार आहे.
हेदेखील वाचा : Putin च्या दौऱ्यामुळे भारताला मिळणार बुस्टर डोस; दोन मोठे निर्णय ठरणार भारत-रशिया संबंधासाठी ‘गेम चेंजर’






