वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असून, सर्वाधिक ठोस पाठिंबा अमेरिकेने दर्शवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून या हल्ल्याबाबत शोक व्यक्त केला आणि स्पष्ट शब्दांत सांगितले की “अमेरिका भारतासोबत ठामपणे उभी आहे.” या हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला, आणि हे भयावह कृत्य बैसरन येथे ज्याला “मिनी स्वित्झर्लंड” म्हणतात – घडले. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सरकारने कडक कारवाईची दिशा स्वीकारली आहे.
टॅमी ब्रूस यांचे सडेतोड उत्तर
शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला ठाम उत्तर दिले. पत्रकाराने भारत-पाकिस्तान सीमावादावर प्रश्न विचारल्यावर ब्रूस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमचे अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री आधीच यावर भूमिका मांडली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो.” तसेच, त्यांनी कोणाचेही नाव न घेता पाकिस्तानातील दहशतवाद्यांना अप्रत्यक्ष इशारा देत सांगितले की, “दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. अमेरिका मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि जखमींच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करते.”
ट्रम्प-मोदी संवाद, आंतरराष्ट्रीय पाठिंबा
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले आणि “भारत या जघन्य आणि भ्याड हल्ल्याच्या दोषींना शिक्षा देण्यास कटिबद्ध आहे,” असे ठामपणे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: काउंटडाउन सुरू! फक्त 7 दिवसांत भारत उचलणार पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल
मोदींचा निर्धार, ‘शोधून काढू, शिक्षा करू’
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे झालेल्या सभेत जोरदार भाषण करताना म्हटले, “मित्रांनो, मी आज बिहारच्या भूमीवरून संपूर्ण जगाला सांगतो – भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढेल, ओळखेल आणि कठोर शिक्षा करेल. आम्ही जगाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत त्यांचा पाठलाग करू.”
#WATCH | #PahalgamTerroristAttack | “…I’m not going to be remarking on it. I will say nothing more on that situation. The President and the Secretary have said things, as has the Deputy Secretary,” says Tammy Bruce, US State Department spokesperson, on being asked if the US… pic.twitter.com/gO7FQ3pNvu
— ANI (@ANI) April 24, 2025
credit : social media
भारताची प्रतिक्रीया, कठोर दंडात्मक उपाययोजना
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये प्रमुख निर्णय म्हणजे –
सिंधू नदी पाणी वाटप करार निलंबित करणे
राजनैतिक संबंध खालावणे
२७ एप्रिलपासून सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे
पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना त्वरित मायदेशी परतण्याचा सल्ला
ही पावले केवळ पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणारी नाहीत, तर दहशतवादाविरोधातील भारताच्या कटिबद्धतेचा ठोस पुरावा आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आत्ता समोर आला पाकिस्तानचा खरा चेहरा; मंत्री इशाक दार यांनी पहलगाम दहशतवाद्यांना म्हटले ‘स्वातंत्र्यसैनिक’
भारत-अमेरिका युती अधिक भक्कम
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दिलेला पाठिंबा केवळ राजनैतिक सन्मान नाही, तर दहशतवादाविरोधात जागतिक एकजुटीचा संदेश आहे. ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा देत भारताच्या सुरक्षिततेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत देखील आता मागे हटणार नसून, दहशतवाद्यांना नामोहरम करण्यासाठी कडवी लढाई लढण्यास सज्ज आहे. या हल्ल्याने भारताची ताकद कमी न होता, त्याचा निर्धार अधिक मजबूत झाला आहे.