Delhi Bomb Blast: ब्रिटनने जारी केली नवीन Travel Warning; भारतातील 'या' भागात प्रवास करण्यास सक्त मनाई ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ब्रिटनने भारतासाठी नवीन ट्रॅव्हल ऍडव्हायजरी जारी , ज्यात काश्मीर खोरे, भारत-पाक सीमा आणि मणिपूर राज्यात प्रवास टाळण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील अलीकडील बॉम्बस्फोटाचा उल्लेख सल्लागारात असून, या भागातील परिस्थिती अस्थिर असल्याचे म्हटले आहे.
FCDO ने इशारा दिला आहे की त्यांच्या सल्ल्याच्या विरोधात प्रवास केल्यास प्रवास विमा अवैध ठरू शकतो, तसेच महिला आणि LGBTQ+ प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
UK travel advisory India 2025 : ब्रिटन ( Britain) सरकारने भारतात राहणाऱ्या किंवा भारतात प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी एक नवीन ट्रॅव्हल ऍडव्हायजरी जारी केली आहे. १० नोव्हेंबर २०२५ रोजी अपडेट केलेल्या या ऍडव्हायजरीत भारतातील काही भागांबद्दल सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर इशारे देण्यात आले आहेत. विशेषतः, भारत-पाकिस्तान सीमा, काश्मीर खोरे आणि मणिपूर राज्य या प्रदेशांमध्ये प्रवास कठोरपणे टाळावा, असा सल्ला यूकेच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (FCDO) दिला आहे.
एफसीडीओने स्पष्टपणे नमूद केले आहे की ब्रिटिश नागरिकांनी भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किलोमीटरच्या आत प्रवास करू नये, कारण हा भाग असुरक्षित घोषित करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या बहुतांश भागात प्रवासावर निर्बंध लावण्यात आले असून, फक्त जम्मू शहरात आणि तेथून विमान प्रवास करण्यास परवानगी आहे. ऍडव्हायजरीत म्हटले आहे की या भागातील सुरक्षा परिस्थिती कधीही बिघडू शकते, त्यामुळे प्रवाशांनी पूर्ण खबरदारी बाळगावी.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर शहरासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवरही प्रवास करण्याविरुद्ध इशारा देण्यात आला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हालचालीदरम्यान सुरक्षा दलांकडून तपासणी वाढवण्यात आली आहे. एफसीडीओने नमूद केले आहे की, काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अस्थिर असून, हिंसक घटना अचानक घडू शकतात.
सल्लागारात मणिपूर राज्याबद्दलही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. २०२३ मध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारानंतर या राज्यात अजूनही कर्फ्यू आणि निर्बंध लागू आहेत. मे ते जुलै २०२५ दरम्यान पुन्हा काही हिंसक संघर्ष घडल्याचे नमूद करत, एफसीडीओने ब्रिटिश नागरिकांना “अनावश्यक प्रवास टाळा” असा स्पष्ट सल्ला दिला आहे.
ब्रिटन सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, जर एखादा प्रवासी एफसीडीओच्या इशाऱ्याच्या विरोधात प्रवास करतो, तर त्याचा प्रवास विमा अवैध ठरू शकतो. वाघा-अटारी सीमा क्रॉसिंगही सध्या बंद असल्याने, त्या मार्गाने जाणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे.
एफसीडीओने महिला प्रवासी, LGBTQ+ प्रवासी आणि एकट्या प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक भिन्नता लक्षात घेता, त्यांनी स्थानिक परिस्थिती, वाहतूक, पोलीस मदत आणि योग्य विमा याबाबत तयारी ठेवावी असा सल्ला देण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Universe Mystery: अनंत आहे अंतराळ! सूर्यमालेत सापडला नववा रहस्यमय ग्रह; अज्ञात विश्वाच्या अस्तित्वाचे संकेत
ब्रिटन सरकारने प्रवाशांना वेळेवर माहिती मिळवण्यासाठी एफसीडीओच्या ईमेल अलर्ट्स आणि “Travel Aware” सोशल मीडिया अकाउंट्स (X, Facebook, Instagram) फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्थानिक माध्यमांवरील बातम्यांवर सतत लक्ष ठेवावे असेही सांगण्यात आले आहे. ब्रिटन सरकारने शेवटी नमूद केले आहे की, “कोणताही प्रवास पूर्णपणे सुरक्षित नसतो. त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्या गंतव्यस्थळावर आधारित योग्य विमा आणि तयारी ठेवणे आवश्यक आहे.” या सल्ल्यामुळे भारतात पर्यटन किंवा व्यावसायिक प्रवासाची योजना आखणाऱ्या अनेक ब्रिटिश नागरिकांनी आपल्या योजना तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.






