असीम मुनीर राष्ट्रपती होणार? पाकिस्तान सरकारचा सत्तापालटाच्या अफवांवर धक्कादायक खुलासा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Asim Munir coup Pakistan : पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्तापालटाच्या चर्चांनी जोर धरला होता. विशेषतः लष्करप्रमुख असीम मुनीर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना हटवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अफवांनी वातावरण तापवले होते. मात्र अखेर पाकिस्तान सरकारने यावर मौन सोडले असून या सर्व वृत्तांचे स्पष्टपणे खंडन केले आहे.
गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट सांगितले आहे की, झरदारींना कोणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा राष्ट्रपती होण्याचा कोणताही हेतू नाही. नक्वी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) वरून हा खुलासा केला. त्यांनी असेही नमूद केले की, झरदारी, शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या या दुर्भावनायुक्त मोहिमेमागे कोण आहे हे सरकारला ठाऊक आहे. भारतामध्ये पाकिस्तानमधील अनेक नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स बॅन असल्याने नक्वी यांचे हे वक्तव्य भारतातील अनेक नागरिकांना दिसले नाही, परंतु आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माध्यमातून या पोस्टची पुष्टी झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump new Tariff policy: डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर नवा टॅरिफ बॉम्ब! 22 देशांना पत्र, भारतासाठीही धोका?
ही सगळी चर्चा सुरु झाली ती अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर. या मोहिमेमध्ये पाकिस्तानची लाजिरवाणी स्थिती झाली होती आणि त्यानंतर असीम मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ पदावर बढती देण्यात आली. पाकिस्तानच्या इतिहासात ते दुसरे फील्ड मार्शल ठरले असून त्यामुळे त्यांच्या हाती अधिक सत्ता आली आहे.
या वाढलेल्या सत्तेमुळे ते राजकारणात सक्रिय होणार का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की, मुनीर सरकारच्या कामात हस्तक्षेप करू लागले आहेत आणि राष्ट्रपती पदावर नजर ठेवून आहेत. मात्र आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा कोणत्याही गोष्टी घडत नाहीत आणि हे फक्त अफवा आहेत. अशा अफवांचा उद्देश देशातील अस्थैर्य वाढवणे हाच आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan’s Baloch Insurgency : बलुच बंडखोरांचा पाकिस्तानवर जोरदार हल्ला! एका तासात 8 धडक कारवाया, BLAचा थक्क करणारा खुलासा
असीम मुनीर हे पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख असून त्यांना २०२२ मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आले होते. नंतर त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला. ते भारतविरोधी वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. ऑपरेशन सिंदूरवेळी त्यांनी भारतावर खोटे आरोप केले आणि द्वेषपूर्ण भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळेच त्यांच्या राष्ट्रपती पदासाठी तयारी करत असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु, सरकारच्या स्पष्ट उत्तरामुळे या चर्चांना ब्रेक लागला आहे.