'आम्ही घाबरत नाही...'; ट्रम्प यांच्या धमक्यांवर 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी दिले उत्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मेक्सिको: सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांनी खळबळ उडवली असून याला जागतिक स्तरावर विरोध केला जात आहे. दरम्यान मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शिनबाम यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांना उत्तर देताना सांगितले की, त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून येणाऱ्या धमक्यांमुळे कोणताही गंभीर धोका वाटत नाही. ट्रम्प यांनी मेक्सिकोवर अधिक कर लादणे, ड्रग्ज कार्टेल्सविरुद्ध लष्करी कारवाई करणे आणि निर्वासितांना परत पाठवण्याच्या इशाऱ्यांवर शिनबाम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कााय म्हणाल्या शिनबाम
एका पत्रकार परिषदेदरम्यान शिनबाम यांना, ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे त्या घाबरलेल्या आहेत का? असा प्रश्न करण्याच आला होता. यावर त्यांनी ठामपणे उत्तर दिले, त्या म्हणाल्या “नाही. मला माझ्या लोकांचा पाठिंबा आहे. ज्या व्यक्तीकडे ठाम विश्वास आणि निश्चितता असते, त्याला घाबरण्याची गरज नसते.” ट्रम्प यांच्या उपायांबद्दल चिंता दूर करताना त्यांनी सांगितले की, दोन्ही सरकारे सध्या चर्चेत असून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘आम्ही सार्वभौमत्वाचे उल्लंघन होऊ देणार नाही’
शिनबाम यांनी स्पष्ट केले की, “मेक्सिकोची सार्वभौमत्त्व आम्ही कोणत्याही परिस्थितीत धोक्यात येऊ देणार नाही. जर कोणी आमच्या मातृभूमीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण देश एकत्र उभा राहील.” ट्रम्प यांनी मेक्सिकोवरील ड्रग कार्टेलवर गंभीर आरोप करत, याला अमेरिकन सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
ट्रम्प यांचे मेक्सिकोवरील आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकच्या अधिकाऱ्यांवर अमेरिकेत बेकायदेशीरपणे लाखो लोकांना प्रवेश दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी प्रवासी आणि स्थलांतरितांच्या समस्यांवर मदत करण्याची तयारी देखील दाखवली आहे. यासंदर्भात लवकरच ते मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी ट्रम्प मेक्सिकोतील उत्पादनावरील टॅरिफ निलंबित करणे आणि अमेरिकेत फेंटेनाइल सारख्या धोकादायक ड्रग्सच्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्याच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करणार आहेत.
मेक्सिको-अमेरिका संबंधांमध्ये तणाव
शिनबाम यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांची सरकार ड्रग कार्टेल किंवा कोणत्याही संघटित गुन्हेगारीला कधीही पाठिंबा देत नाही. त्यांनी सांगितले, “आम्ही केवळ मेक्सिकोच्या संप्रभुतेचे रक्षण करत आहोत.” तसेच, अमेरिकन सरकारने कार्टेल्सना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यास त्या निर्णयाचे कोणतेही परकीय परिणाम मेक्सिकोला मान्य असणार नाहीत. या घडामोडींमुळे मेक्सिको-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी, शिनबाम यांनी संयम बाळगून कूटनीती मार्गाने प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.






