अपहरण करून खंडणी मागितल्याचा आरोप
व्यावसायिकाचे वकील घेणार पत्रकार परिषद!
आरोपीच्या मॅसेजमुळे तक्रारदार व्यावसायिक चिंतेत
Dombivli Kidnapping Case : डोंबिवली पूर्वेतील देशमुख होम परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तक्रारदार व्यावसायिकाचे वकील शुक्रवारी दुपारी मानपाडा पोलीस ठाण्यासमोर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच आरोपींना अटक होत नाही म्हणून या प्रकरणात मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
व्यावसायिक अपहरण आणि खंडणी प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजित सिंह यांच्यासह चार जण आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप आरोपींवर अटकेची कारवाई झाली नसल्याने व्यावसायिक आणि त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
अखेर या प्रकरणात उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीकडून मी निर्दोष मुक्त झाल्याचा मेसेज समाजमाध्यमांवर किंवा इतर माध्यमांतून पसरवला जात असल्याचा दावा तक्रारदार व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला असून तक्रारदारांनी चिंता व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी व्यावसायिकांचे वकील मानपाडा पोलीस ठाण्यासमोर पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका संदर्भातली माहिती पोलिसांची भूमिका, तपासाची सद्यस्थिती आणि पुढील कायदेशीर वाटचाल याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
त्यामुळे या पत्रकार परिषदेत वकील नेमका काय खुलासा करतात आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.