भातकापणी करताना बिबट्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी
घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागावर मृतदेह हलवू न देण्याचा घेतला पवित्रा
वन विभागाने ड्रोन कॅमेरे व पिंजऱ्यांद्वारे बिबट्याला पकडण्यासाठी केली शोधमोहीम
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. यामध्ये सासू आणि सून शेतात भातकापणी करत होत्या. त्या दोघीही आपल्या कामात मग्न असतानाच अचानक मृत्यूनं अंगावर झडप घेतली. दोघींवरही अचानक बिबट्यानं हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात सासू भीमाबाई जिजाभाऊ भोईर (वय ५५) यांचा मृत्यू झाला आहे, तर स्वतःचा बचाव करताना पडल्याने सून अश्विनी सुरेश भोईर (वय ३५) या जखमी झाल्या आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी पिंपळगाव जोगा धरण परिसरातील भोईरवाडी येथे ही घटना घडली. या घटनेची माहिती भोईरवाडीचे सरपंच प्रदीप भोईर यांनी पोलीस आणि वन विभागाला कळवली. त्यानंतर ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व कर्मचारी, तसेच जुन्नरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि वनरक्षक सचिन मोडवे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
भीमाबाई भोईर आणि अश्विनी भोईर या दोघी भातकापणीसाठी गेल्या होत्या. भात कापणी करीत असताना दुपारी या दोघींवर अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात गळ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने भीमाबाई भोईर यांचा मृत्यू झाला आहे, तर अश्विनी भोईर या जखमी झाल्या असून त्यांना उपचारांसाठी हलविण्यात आलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर घटनास्थळी आलेल्या वन विभागाच्या पथकावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आणि महिलेचा मृतदेह जागेवरून हलवू न देण्याचा पवित्रा घेतला. भरदिवसा घडलेल्या या भयंकर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत ड्रोन कॅमेरे तसेच वन विभागाचे पथक घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे सांगितले. हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, परिसरात पिंजरे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची घटना कोठे घडली?
ही घटना बुधवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरण परिसरातील भोईरवाडी येथे घडली.
या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला आणि कोण जखमी झाले?
या हल्ल्यात सासू भीमाबाई जिजाभाऊ भोईर (वय ५५) यांचा गळ्याला गंभीर जखम होऊन मृत्यू झाला, तर सून अश्विनी सुरेश भोईर (वय ३५) या जखमी झाल्या आहेत.
वन विभागाकडून कोणती कारवाई सुरू आहे?
जुन्नर वन विभागाने घटनास्थळी ड्रोन कॅमेरे व पथक पाठवून परिसरात पिंजरे लावण्याचे निर्देश दिले असून, बिबट्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.