मध्यरात्री सोयाबीन चोरीचा पर्दाफाश
वाहनासह चार गोण्या जप्त
एकाला ठोकल्या बेड्या
ओतूर : ओतूर परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ओतूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जाकमाथा येथे मध्यरात्री सोयाबीन चोरी करताना एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून, या कारवाईत चोरीसाठी वापरलेले वाहन आणि सोयाबीनच्या चार गोण्या असा एकूण ३ लाख १९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपी फरार आहेत.
शनिवार (दि. २८ नोव्हेंबर २०२६) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास जाकमाथा (ओतूर) येथील शेतकरी जयसिंग शंकर शेटे यांच्या राहत्या घराजवळील कांदा चाळीत सोयाबीनच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी काही चोरटे पांढऱ्या रंगाच्या 'छोटा हत्ती' वाहनातून (क्रमांक एमएच १४ केजी ५६९६) सोयाबीनच्या गोण्या चोरून भरत असल्याचे शेटे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने शेजाऱ्यांना जागे केले आणि पोलिसांच्या आपत्कालीन ११२ क्रमांकावर संपर्क साधला.
पोलिसांनी केली कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच तीन चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला, मात्र पोलिसांनी सर्वेश संतोष बटवाल (वय २०, रा. नेतवड माळवाडी, ता. जुन्नर) याला घटनास्थळीच ताब्यात घेतले. तपासादरम्यान या गुन्ह्यात अरबाज रज्जाक शेख (रा. डिंगोरे), साहील रेवननाथ शिंदे (रा. डिंगोरे) आणि कार्तिक बोटे (रा. गणपती फाटा, नेतवड) यांची नावे निष्पन्न झाली आहेत. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, फरार आरोपी व स्पोर्ट बाईकच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत.
आलमे येथील चोरीचाही उलगडा
चौकशीदरम्यान आरोपीने जुन्नर तालुक्यातील आलमे येथेही सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२०२६ अन्वये कलम ३०३(२) प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक आणि नागरिकांना आवाहन
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, हवालदार बाळशिराम भवारी, दिनेश साबळे व पथकाने केली आहे. पुढील तपास बाळशिराम भवारी करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतमालाच्या साठवणुकीच्या ठिकाणी सतर्कता बाळगावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओतूरमध्ये सोयाबीन चोरीची घटना कुठे आणि कधी घडली?
जाकमाथा (ओतूर) येथे शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास शेतकरी जयसिंग शेटे यांच्या घराजवळील कांदा चाळीतून सोयाबीनच्या गोण्या चोरी करण्याचा प्रयत्न झाला.
पोलिसांनी काय कारवाई केली?
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वेश संतोष बटवाल (वय २०) याला रंगेहात ताब्यात घेतले. चोरीसाठी वापरलेले वाहन आणि सोयाबीनच्या चार गोण्या असा एकूण ३ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आणखी कोण आरोपी आहेत?
अरबाज रज्जाक शेख, साहील रेवननाथ शिंदे आणि कार्तिक बोटे यांची नावे तपासात निष्पन्न झाली असून, हे तिघे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.