हिवाळ्यात डिहायड्रेशनचा धोका
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खा या ८ गोष्टी
संत्र्यापासून नारळपाण्यापर्यंत जाणून घ्या फायदे
Winter Health Tips: हिवाळ्यात अनेकदा कमी तहान लागते. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्यापेक्षा कमी पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का की थंडीच्या दिवसात डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची कमतरता जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते. हिवाळ्यात कमी घाम येत असल्यामुळे आणि तहान कमी लागत असल्यामुळे लोक पुरेसे पाणी पीत नाहीत.
याचा परिणाम शरीराची पचनक्रिया, त्वचा, किडनी आणि ऊर्जेच्या पातळीवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत, केवळ पाणी पिणेच नव्हे, तर आपल्या आहारात पाण्याने भरपूर असलेल्या फळे आणि भाज्यांचा समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी दररोजच्या आहारात कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, जाणून घ्या.
संत्री
हिवाळ्यात संत्री सहज उपलब्ध असतात. संत्र्यांमध्ये पाणी आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि रोगप्रतिकार शक्ती देखीाल मजबूत होते.
पेरू
पेरूमध्ये पाणी, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात. हिवाळ्यातील दररोजच्या आहारात पेरुचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते. याशिवाय हे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात.
काकडी
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. सॅलड म्हणून काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता काही प्रमाणात भरुन निघते. त्यामुळे आहारात काकडीचा समावेश करु शकता.
गाजर
गाजरांमध्ये पाणी, फायबर आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतात. गाजराचे सॅलड, ज्यूस किंवा सूप म्हणून खाल्ल्याने देखील शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.
मुळा
मुळ्यामध्ये पाणी आणि फायबर असते. हिवाळ्यात मुळ्याचे सॅलड खाल्ल्याने पोषण आणि शरीरातील पाण्याची पातळी दोन्ही मिळते.
भाज्यांचे सूप
हिवाळ्यात गरम भाज्यांचे सूप पिणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. टोमॅटो, गाजर, पालक आणि इतर भाज्यांपासून बनवलेल्या सूपमधून शरीरातील पाणी आणि अनेक पोषक तत्वे मिळतात.
डाळिंब
डाळिंबामध्ये पाणी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. नियमित आहारात डाळिंबाचा समावेश केल्याने पोषण मिळते आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
नारळाचे पाणी
नारळाच्या पाण्यात पाणी आणि पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात. ते शरीरातील द्रवपदार्थांची भरपाई करण्यास मदत करतातते. परंतु, ज्या लोकांना किडनीचा आजार किंवा पोटॅशियमची समस्या आहे, त्यांनी नारळ पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.