भाजपचं सेवा दूत अभियान १ डिसेंबरपासून सुरू होणार
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचा - रविंद्र चव्हाण
सरकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर
BJP Seva Doot Abhiyan : भारतीय जनता पार्टीकडून देशभरात 'सेवा दूत अभियान' राबवण्यात येणार आहे. १ ते २५ डिसेंबर २०२६ या कालावधीत हे अभियान चालणार असून, त्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी पनवेलमध्ये ठाणे-कोकण विभागीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
सेवा दूत अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नागरिकांच्या अडचणी जाणून घेणं, त्यांच्या समस्या समजून घेणं आणि शक्य ते सहकार्य करणं, यावर या अभियानात भर दिला जाणार आहे.
याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे.
पनवेलमधील कार्यशाळेत बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या. नागरिकांना आवश्यक मदत करा आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना योग्य माहिती द्या, असं चव्हाण यांनी सांगितलं. केवळ अभियान राबवून थांबायचं नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
या कार्यशाळेत अभियानाची कार्यपद्धती, नियोजन आणि अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार माधवीताई नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील आणि उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित होते.
याशिवाय ठाणे आणि कोकण विभागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या कार्यशाळेत सहभाग घेतला. आता १ ते २५ डिसेंबरदरम्यान हे अभियान प्रत्यक्ष राबवलं जाणार असून, भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असणार आहे.