Tilak Bhavan Job Fair 
महाराष्ट्र

Congress Job Fair: ३० हून अधिक कंपन्या, ८४६ मुलाखती, ४८६ जॉब ऑफर्स; काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra Congress Tilak Bhavan Job Fair: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईतील टिळक भवन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या उपक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदवला.

प्रियंका मुंदिनकेरी
  • बेरोजगार तरुणांसाठी काँग्रेसचा पुढाकार
  • टिळक भवनातील मेळाव्यात ४८६ जॉब ऑफर्स
  • मेळाव्यात महिलांचा मोठा सहभाग

मुंबई: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आज टिळक भवन येथे आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात ३० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. दिवसभरात एकूण ८४६ मुलाखती पार पडल्या, ४८६ जॉब ऑफर्स देण्यात आल्या, तर २८९ उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांच्या हस्ते झाले. सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणजितसिंग सप्रा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा समारोप झाला.

या मेळाव्यातील विशेष बाब म्हणजे सहभागी उमेदवारांपैकी सुमारे ७० टक्के उमेदवार महिला होत्या, तर ९९ टक्के उमेदवार जेन झी (Gen Z) पिढीतील होते. महिलांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि तरुणांचा प्रतिसाद यामुळे रोजगाराच्या संधींबाबत युवक-युवतींच्या अपेक्षा अधोरेखित झाल्या.डॉ. रूपा मडकईकर, डॉ. निधी त्रिवेदी आणि श्रीमती मेघना यांनी एकूण ११० उमेदवारांचे समुपदेशन केले. या मार्गदर्शनाच्या माध्यमातून उमेदवारांच्या करिअरविषयक शंकांचे निरसन करणे, त्यांच्या क्षमता ओळखण्यास मदत करणे आणि रोजगार प्रक्रियेसाठी त्यांना अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, उपाध्यक्ष राजन भोसले आणि प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांच्या सहकार्याने हा रोजगार मेळावा यशस्वीरीत्या पार पडला. माजी खासदार कुमार केतकर, अर्थतज्ज्ञ प्रा. संजीव चांदोरकर, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजिंक्य देसाई, डॉ. गजानन देसाई, ज्येष्ठ कामगार नेते मोहन तिवारी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या उपाध्यक्षा मेघा कुलकर्णी आणि राज्य समन्वयक अमोल महाडिक यांच्यासह विविध मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.

मुंबईतील रोजगार मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर आगामी काळात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड यांसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती धनंजय शिंदे यांनी दिली.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका