ताडोबातील 80 वाघांच्या विविध रूपांचे छायाचित्रांतून दर्शन
ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार मोहन बने यांची दहा वर्षांची मेहनत
28 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन पाहण्याची संधी
Dilip Vengsarkar : ताडोबाच्या जंगलातील वाघांचे मनमोहक दर्शन घडवणाऱ्या 'आपलं ताडोबा' या व्याघ्र छायाचित्र प्रदर्शनाला भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भेट दिली. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या दालनात हे प्रदर्शन सुरू आहे. ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार मोहन बने यांच्या जवळपास दहा वर्षांच्या मेहनतीतून हे प्रदर्शन साकारले आहे.
या प्रदर्शनात ताडोबाच्या जंगलातील जवळपास 80 वाघांची विविध रूपे, त्यांचे हावभाव, हालचाली आणि जंगलातील निसर्गसौंदर्य टिपणारी अप्रतिम छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. वाघांच्या नैसर्गिक अधिवासातील विविध क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी बने यांनी घेतलेली मेहनत या छायाचित्रांतून अनुभवायला मिळते.
प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर वेंगसरकर यांनी मोहन बने यांच्या छायाचित्रणाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, आम्ही वाघ पाहण्यासाठी जंगलात जातो, तेव्हा अनेकदा एकही वाघ दिसत नाही. मात्र, मोहन बने यांना इतक्या वर्षांत कितीतरी वाघ पाहायला मिळाले आणि त्यांचे असे सुंदर क्षण टिपता आले, याचे खरोखर आश्चर्य वाटते. त्यांच्या चिकाटीचे आणि संयमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांना खरोखर तोड नाही.
प्रत्येकाने हे प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. वन्यजीवप्रेमींसाठी हे प्रदर्शन पर्वणी असून, ताडोबाच्या जंगलातील थरारक क्षण अनुभवण्याची संधी यातून मिळते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडूनही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार, 28 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. वन्यजीव आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.